गुजरातच्या भूमीवरून महाराष्ट्राच्या दिशेने सरकणाऱ्या शक्ती चक्रीवादळाबाबत हवामान विभागाकडून मोठी अपडेट समोर आली आहे. हवामान खात्याने ‘शक्ती’ चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार असल्याचं सांगत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबईसह किनारपट्टीवरील जिल्हे, तसंच मराठवाडा, विदर्भातही सतर्कतेचा इशारा दिला आहे.

7 ऑक्टोबरपर्यंत ‘शक्ती’चा प्रभाव; पावसाची शक्यता

भारतीय हवामान विभागाने चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात सतर्कतेचा इशारा दिला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना अधिक सतर्क राहण्याचं सांगण्यात आलं आहे. ५ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तर किनारपट्टीवरील समुद्राची स्थिती अत्यंत धोकादायक राहील. समुद्रात चक्रीवादळ तीव्र होण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. बोटींना बंदरातच थांबण्याचं सांगितलं असून जे समुद्रात आहेत त्यांना तात्काळ मागे परत येण्याचं सांगितलं आहे. तसंच किनारपट्टीवरील रहिवाशांना सावधानेचा इशारा दिला आहे. भरतीमुळे पाणी साचू शकतं, अशात सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

अरबी समुद्रात तयार झालेल्या खोल दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात आणि महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होऊ शकतो. याशिवाय राजस्थान आणि उत्तर प्रदेशातही चक्रीवादळाचा परिणाम जाणवेल, ज्यामुळे राजस्थानपासून हरियाणा आणि दिल्लीपर्यंत हलक्या सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या काळात राज्याच्या काही भागात तुरळक ते मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.

विदर्भ-मराठवाड्यातही तुरळक पावसाचा अंदाज

विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांतून मान्सून परतीचा पाऊस सुरू झाला असून 10 ते 12 ऑक्टोबरपर्यंत तो कायम राहण्याची शक्यता आहे. हा पाऊस हलक्या ते मध्यम स्वरूपाचा असेल. आज कोकणपट्टा वगळता महाराष्ट्रातील बहुतेक भागांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

वादळाची तीव्रता वाढण्याचा अंदाज; सतर्क रहा!

गुजरातच्या किनाऱ्याजवळ कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढते आहे. पुढील 24 तासांत हवामानात मोठे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अरबी समुद्रात तयार झालेला हा पट्टा महाराष्ट्राच्या दिशेनं सरकेल का याकडे हवामान खात्याचं लक्ष आहे. तसं झाल्यास अवकाळी पावसाची शक्यता निर्माण होऊ शकते.

उत्तर-पश्चिम बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण, 4 ऑक्टोबरला तीव्रता वाढण्याची शक्यता. 5 ते 7 ऑक्टोबरदरम्यान पश्चिमी विक्षोभ जास्त सक्रिय होणार, त्यामुळे हवामानात मोठे बदल दिसतील. 12ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता कायम, महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ सुरू राहणार, मात्र पावसामुळेही हवेत गारवा जाणवणार नाही.