Shaktipeeth Mahamarg : महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पात सरकारने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला असून सुधारित आराखडा आता राज्य सरकारच्या मंजुरीसाठी पाठवला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात झालेल्या तीव्र जनआंदोलनानंतर राज्य सरकारने मार्गामध्ये महत्त्वपूर्ण फेरबदल करत सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश केला आहे.
कोल्हापूरच्या तीव्र विरोधानंतर मार्ग फेरबदलाचा निर्णय Shaktipeeth Mahamarg
महामार्गाच्या मूळ आराखड्यानुसार कोल्हापूरमधील करवीर, कागल, हातकणंगले, भुदरगड, आजरा आणि चंदगड या तालुक्यांमधून मोठ्या प्रमाणावर शेती जमीन संपादित होणार होती. शेतकरी आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात मोठी चळवळ उभी केली. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढत चाललेल्या नाराजीची दखल घेत सरकारने मार्गात बदल करण्याचे आश्वासन देत सुधारित आराखडा तयार करण्यास एमएसआरडीसीला सांगितले.
नवीन मार्गात साताऱ्याचा समावेश, १३ जिल्ह्यांवरून महामार्ग
नव्या आराखड्यानुसार कागल आणि हातकणंगले तालुक्यांचा मोठा टप्पा महामार्गातून वगळण्यात आला आहे. तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही मार्गात बदल करण्यात आले आहेत. सुधारित मार्ग आता यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, लातूर, बीड, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग अशा एकूण १३ जिल्ह्यांतून जाणार आहे. साताऱ्यातील माण आणि खटाव तालुके नव्याने जोडले गेले आहेत. Shaktipeeth Mahamarg
लांबी, खर्च आणि भूसंपादन तिपटीने वाढ
मार्ग बदलामुळे प्रकल्पाची लांबी तब्बल **८०२ किमी वरून ८५६ किमी** इतकी वाढली आहे. यामुळे खर्चात तब्बल **१५ हजार कोटींची वाढ** होऊन एकूण अंदाजित खर्च **१ लाख १ हजार कोटी रुपयांवर** गेला आहे.






