Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या व्हायरल आराखड्यावरून राज्यात खळबळ; या जिल्ह्याला वगळले??

Published:
पूर्वीच्या आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करणार होता. त्यानंतर उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांतून मार्ग जात सांगली जिल्ह्यात पोहोचत होता
Shaktipeeth Mahamarg : शक्तिपीठ महामार्गाच्या नव्या व्हायरल आराखड्यावरून राज्यात खळबळ; या जिल्ह्याला वगळले??

Shaktipeeth Mahamarg : राज्यातील महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्ग प्रकल्पाचा नवा प्रस्तावित आराखडा गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. मुख्यमंत्री यांनी अधिवेशनात विरोध लक्षात घेऊन नवीन मार्ग आखणीची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगितल्यानंतर परिस्थिती अधिक गोंधळलेली बनली. आता या नव्याने समोर आलेल्या यादीमध्ये कोणती गावे बाधित होणार, कसा मार्ग बदलणार, कोणते तालुके वगळले जाणार, याबाबत अनेक तर्क–वितर्कांना उधाण आले आहे.

पूर्वीचा आराखडा कसा होता

पूर्वीच्या आराखड्यानुसार शक्तिपीठ महामार्ग धाराशिव जिल्ह्यातून बार्शी तालुक्यात प्रवेश करणार होता. त्यानंतर उत्तर सोलापूर, मोहोळ, पंढरपूर आणि सांगोला तालुक्यांतून मार्ग जात सांगली जिल्ह्यात पोहोचत होता. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात या मार्गामुळे बागायती पट्ट्याला मोठा फटका बसणार होता. कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या काठावर असलेल्या मोठ्या प्रमाणातील शेतीपूरक भागावर परिणाम होणार असल्याने स्थानिक पातळीवर व्यापक आंदोलन झाले. हा विरोध एवढा तीव्र झाला की सरकारला मार्गाचा पुनर्विचार करावा लागला.

काय असेल नवा बदल ?

नव्या मार्गातील सर्वात मोठा बदल म्हणजे उत्तर सोलापूर आणि सांगोला तालुके पूर्णपणे मार्गाबाहेर पडत आहेत. त्यांच्या जागी माढा आणि माळशिरस या तालुक्यांचा समावेश नव्या यादीत दिसत आहे. तसेच सातारा जिल्ह्याचा नव्याने समावेश करण्यात आल्याने हा महामार्ग सातारा, सांगली, चंदगडमार्गे दोडामार्ग तालुक्यातून गोव्याकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या बदलामुळे पूर्वीच्या आराखड्यातील काही तालुके आणि गावांवरील दबाव कमी होईल, तर नव्या भागांमध्ये जमीन अधिग्रहणाचा प्रश्न निर्माण होणार आहे. Shaktipeeth Mahamarg

व्हायरल झालेल्या याद्यांविषयी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने मात्र कोणतीही अधिकृत माहिती देण्यास नकार दिला आहे. अधिकाऱ्यांच्या मते, सोशल मीडियावर फिरणारी यादी ही अधिकृत स्वरूपाची नसून, सध्या कोणतेही गट–नंबर किंवा औपचारिक नकाशे विभागाकडे आलेले नाहीत. नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकीनंतर संपूर्ण अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. त्यामुळे सध्या चालणारी चर्चा ही पूर्णपणे अंदाजांवर आधारित असल्याचे ते म्हणतात.

या परिस्थितीत शेतकऱ्यांची चिंता वाढलेली दिसते. जमीन अधिग्रहणासाठी चौपट मोबदल्याचा दावा करण्यात येत असला तरी तो रेडीरेकनरच्या आधारावर असल्याने प्रत्यक्षात मिळणारी रक्कम बाजारभावाच्या तुलनेत अत्यंत कमी ठरेल, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सूरत–चेन्नई महामार्गातील अनुभव पाहता, कमी रेडीरेकनर असलेल्या भागांत शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे नवीन आराखड्यातील गावांमध्येही घबराट पसरलेली आहे.

नव्या आराखड्यातील जिल्हानिहाय गावे पुढीलप्रमाणे आहेत:

बार्शी तालुका – रातजंन, सर्जापूर, राळेरास, सासुरे, मुंगशी (वा.), दहिटणे, तडवळे
मोहोळ तालुका – वाळूज (दे.), भैरववाडी, देगाव, वाफळे, सिद्धेवाडी, तेलंगवाडी, शेटफळ, बैरागवाडी
माढा तालुका – धानोरे, बुद्रकवाडी, मानेगाव, पाचफुलवाडी, खैराव, कुंभेज, अंजनगाव (खे.), मोडनिंब, बैरागवाडी
पंढरपूर तालुका – बार्डी, करंकब, भोसे, नेमतवाडी, शेवते, पेहे, अव्हे
माळशिरस तालुका – जाबुंड, विठ्ठलवाडी, खळवे, बोंडले, उघडेवाडी, वेळापूर, निमगाव (म.), चांदापुरी, तरंगफळ, मगरवाडी, गारवाड

या नव्या मार्गात माढा आणि माळशिरस तालुक्यांतील मोठा भूभाग येत असल्यामुळे या भागात विकासाचे नवे पर्याय निर्माण होऊ शकतात. परंतु त्याचवेळी शेती, बागायती जमिनींचा प्रश्न अधिक गहन होणार आहे. पूर्वीच्या ५२ गावांच्या तुलनेत नव्या आराखड्यात ४२ गावे बाधित असल्याचे अंदाज आहेत. नवीन मार्गाची अधिकृत घोषणा होईपर्यंत ही चर्चा थांबेल असे दिसत नाही. पण सर्वाधिक अपेक्षा ही सरकारकडून येणाऱ्या पारदर्शक अधिसूचनेची आहे, जीच या चर्चेला पूर्णविराम देऊ शकते.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews