बारामतीत पवार-काका पुतणे झेडपीसाठी एकत्र? महिनाअखेरीस पवार काका-पुतण्यांच्या पक्षांचं विलिनीकरण ?

Written by:Smita Gangurde
Published:
जिल्हा परिषदांनंतर राज्यात पुढचे तीन वर्ष राज्यात निवडणुका नाहीत. दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा नव्यानं पक्षबांधणी करण्याची आणि पक्षाचं नियोजन करण्याची हीच वेळ आहे
बारामतीत पवार-काका पुतणे झेडपीसाठी एकत्र? महिनाअखेरीस पवार काका-पुतण्यांच्या पक्षांचं विलिनीकरण ?

मुंबई – महापालिका निवडणुकांतील अपयशानंतर जिल्हा परिषद निवडणुकांसाठी अजित पवार मैदानात उतरले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी बारामतीसह अनेक ठिकाणी एकत्र लढेल, असं दिसतंय. शरद पवारांचे उमेदवारही घड्याळ चिन्हावर अनेक ठिकाणी एकत्र दिसणार आहेत. या महिनाअखेरीस दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चाही जोर धरतेय.

अजित पवार मैदानात, दोन्ही राष्ट्रवादींची युती

महापालिका निवडणुकांत पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये एकत्र लढूनही पवार काक-पुतण्यांना अपेक्षित यश मिळू शकलं नाही. निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून उपमुख्यमंत्री अजित पवार झेडपी निवडणुकांसाठी सक्रिय झाल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत शरद पवार यांची भेट घेत त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी जिल्हा परिषदेसाठी एकत्र लढणार असल्याचे संकेत दिले. मतदारांतील संभ्रम टाळण्यासाठी अनेक ठिकाणी दोन्ही पक्षांचे उमेदवार तुतारीऐवजी घड्याळ चिन्हावरच लढणार यावरही शिक्कामोर्तब करण्यात आलंय. अगदीच ज्या ठिकाणी संघर्ष असेल त्यात ठिकाणी दोन चिन्हं वापरण्यात येणार आहेत.

बारामतीतही काका-पुतणे एकत्र लढणार

दुसरीकडे लोकसभा आणि विधानसभेला एकमेकांना आव्हान देणारे पवार काका-पुतणे बारामतीतही एकत्र दिसण्याची शक्यता आहे. शरद पवार राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेच्या ३ आणि पंचायत समित्यांच्या ६ जागांची मागणी अजित पवारांकडे करण्यात आलीय. पुणे जिल्ह्यात इतरत्र दोन्ही पक्ष एकत्र लढतायेत हे स्पष्ट झालंय. शरद पवार महापालिका निवडणुकांच्या प्रचारापासून दूर राहिल्यानं राज्यात शरद पवार राष्ट्रवादीची कामगिरी समाधानकारक झालेली नाही. राज्यातील २९ महापालिकांपैकी १५ महापालिकांत शरद पवार राष्ट्रवादीला भोपळा मिळाला. अजित पवार यांचा पक्षही फारसा करिश्मा करु शकलेला नाही.

राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार?

हे सगळं राजकीय परिस्थिती पाहता या महिनाअखेरीस दोन्ही राष्ट्रवादींचं विलिनीकरण होणार असल्याची चर्चा रंगतेय. पक्षाचे नेते मात्र याबाबत ठामपणे बोलण्यास तयार नाहीयेत. राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं तर ते दोन्ही पक्षांच्या पथ्यावर पडणारं आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची योग्य वेळ?

1. महिपालिकेनंतर जिल्हा परिषदेसाठी दोन्ही पक्ष एकत्र
२. शरद पवार अजित पवारांसोबत आल्यास महायुतीत महत्त्व वाढेल
३. शरद पवारांच्या 8 खासदारांमुळे अजित पवार शिंदेंच्या ताकदीचे होतील
4. दिल्लीत सुप्रिया सुळेंचा केंद्रीय मंत्रिपदी, राज्यात रोहित पवारांना मंत्रिपदाची संधी
5. राज्यसभेत जाण्यासाठी शरद पवारांना महायुतीचा पर्याय राहील

जिल्हा परिषदांनंतर राज्यात पुढचे तीन वर्ष राज्यात निवडणुका नाहीत. दोन्ही पक्ष एकत्र आले तर पुन्हा नव्यानं पक्षबांधणी करण्याची आणि पक्षाचं नियोजन करण्याची हीच वेळ असल्याचं सांगण्यात येतंय. हे सगळं लक्षात घेता राष्ट्रवादीचं विलीनीकरणाची होणार का, शरद पवार हे अजित पवारांसोबत जात महायुतीत पर्यायानं एनडीएत जाणार का, हे पाहावं लागणार आहे.

 

Follow Us :GoogleNews