मुंबई- निवडणुकीत मतचोरी कशी केली जाते, असा आरोप काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी सातत्यानं करतायेत. आता हाच धागा पकडत शरद पवारींनीही मोठा गौप्यस्फोट केलाय

विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटले, आणि त्यांनी 160 जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती, असा दावा करत खळबळ उडवून दिलीय

काय म्हणाले शरद पवार?

विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन माणसं मला भेटले, आणि त्यांनी 160 जागांवर मतांची फेरफार करून निवडणूक जिंकवण्याची गॅरंटी दिली होती. संबंधित दोन्ही लोकांना शरद पवार काँग्रेस नेते राहुल गांधीकडे घेऊन गेले होतो,
आम्ही दोघांनीही याबाबत चर्चा केल्याचा दावा पवारांनी केला. मात्र कोणत्याही चुकीच्या मार्गाने जाण्याऐवजी जनतेमध्ये जाऊन सरळ मतं मागण्याचं ठरवलं असं पवारांनी म्हटलंय

महाराष्ट्राची हास्य जत्रा, मुख्यमंत्र्यांची टीका

शरद पवारांच्या या गौप्यस्फोटानंतर पवारांना भेटलेली ती दोन माणसं कोण याची चर्चा सुरु झालीय. या गौप्यस्फोटावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिलीय.

दिल्लीमध्ये कपिल शर्मा कॉमेडी शो आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची हास्य जत्रा सुरू आहे. असं मुख्यमंत्री म्हणालेत. शरद पवार मोठे आदरणीय नेते आहेत, त्यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थोडा संयम बाळगावा लागतो. जर ती दोन माणसे पवार साहेब यांना भेटण्यासाठी आली होती तर त्यांनी तत्काळ त्यांच्यावर कारवाईची मागणी करायला हवी होती.

पवारांकडे जर ती दोन माणसे गेले असतील तर त्यांनी राहुल गांधींकडे घेऊन गेले ते कशासाठी घेऊन गेले ? तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करण्यासाठी घेऊन गेले का ? मग तर सगळेच अपराधी आहेत. एखाद्याच गुन्हा जो लपवतो तो सुद्धा अपराधी असतो त्यामुळे अपराधी कोण हे तुम्ही ठरवा. असं सांगत त्यांनी पवारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलंय.

इतक्या महिन्यांनी पवारांचे आरोप का?

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीला जवळपास 8 महिने झालेत. त्यामुळे शरद पवारांनी इतक्या महिन्यांनी आरोप का केला असा सवाल उपस्थित होतोय. राहुल गांधींनी केलेल्या मतचोरीच्या आरोपानंतर इंडिया आघाडीनं लढाई आणखी तीव्र करण्याचं ठरवलंय. 11 ऑगस्टला निवडणूक आयोगाच्या कार्यालयावर सर्वपक्षीय विरोधकांनी मोर्चा काढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळं येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हा मुद्दा महत्त्वाचा ठरण्याची शक्यता आहे.