‘कुणाचा टांगा पलटी, कुणाचे घोडे फरार?’, नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पेटला

Written by:Smita Gangurde
Published:
महापालिका निवडणुकीत दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करतायेत. त्यातच टांगा पलटीवरुन हे नेते एकमेकांवर तुटून पडलेत.
‘कुणाचा टांगा पलटी, कुणाचे घोडे फरार?’, नवी मुंबईत शिंदे विरुद्ध नाईक संघर्ष पेटला

नवी मुंबई- नवी मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदे शिवसेना आणि भाजपा आमनेसामने आहेत. हा संघर्ष नवी मुंबईचे नेते गणेश नाईक विरुद्ध उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असा मानण्यात येतोय. नवी मुंबईवर एकहाती वर्चस्व असलेल्या गणेश नाईक यांना या महापालिका निवडणुकीत शिंदे शिवसेनेनं आव्हान दिलंय. तर गणेश नाईक ठाण्यात शिरकाव करु पाहतायेत. त्यांनी ठाण्यात सुरु केलेल्या जनता दरबारामुळे यापूर्वीही महायुती सरकारमध्ये वाद निर्माण झाला होता.

आता महापालिका निवडणुकीत दोन्ही नेते एकमेकांवर सडकून टीका करतायेत. त्यातच टांगा पलटीवरुन हे नेते एकमेकांवर तुटून पडलेत.

कुणाचा टांगा पलटी होणार?

एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईत प्रचार करत असताना भाजप म्हणजेच गणएश नाईक यांचा सहज पराभव करु असं विधान प्रचारादरम्यान केलं होतं. टांगा पलटी होईल, असं ते अप्रत्यक्षरित्या म्हणाले होते. त्याला गणेश नाईक यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. गणेश नाईक म्हणाले की मला हलक्यात घेऊ नका, तुमचा टांगा पलटी करुन घोडेही बेपत्ता करीन अशी टीका त्यांनी शिंदे यांच्यावर केलीय. यावरुन प्रचारात जोरदार घमासान सुरुये.

शिंदे शिवसेनेचं नाईकांना काय प्रत्युत्तर?

यावर शिंदे शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं., एकनाथ शिंदेंचा टांगा पलटी करण्याची भाषा गणेश नाईक यांनी करु नये, शिंदेंनी आदेश दिला तर आम्हीच गणेश नाईक यांचा टांगा पलटी करुन घोडे गायब करु असं देसाई म्हणालेत. नवी मुंबईचे प्रश्न सोडवण्यासाठी ते रखडवण्याचं काम गणेश नाईक यांनी केल्याची टीकाही त्यांनी केलीय.

दोन्ही नेत्यांची वर्चस्वाची लढाई

ठाणे आणि नवी मुंबईवर वर्चस्व कुणाचं, यावरुन शिंदे आणि नाईक यांच्यातील संघर्ष सुरु आहे. एकनाथ सिंदे नवी मुंबई महापालिका निवडणूक प्रचारात गणेश नाईक यांच्यावर एकहाती सत्तेचा आरोप करतायेत. तसंच महापालिकेत मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोपही करण्यात येतोय. तरुण नेतृत्वाला संधी नाकारली. नवी मुंबईचा विकास होऊ दिला नाही, राजकीय दडपशाही नाईकांकडून होत असल्याचा आरोप एकनाथ शिंदे जाहीर सभांतून करतायेत.

तर गणेश नाईकही एकनाथ शिंदेंना प्रत्युत्तर देतायेत. बाहेरुन येऊन नवी मुंबईत राजकारण करत असल्याचा आरोप शिंदेंवर करण्यात येतोय. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना फोडल्याचा आरोपही गणेश नाईक करतायेत. महापालिकांच्या अधिकारावर गदा आणण्याचं काम एकनाथ शिंदेंनी केलं असा आरोपही गणेश नाईक करतायेत.

आता या संघर्षात मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार हे आता पाहावं लागणार आहे.