राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली असून अनेक जिल्ह्यांतील नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले आहे. काही ठिकाणी शेती वाहून गेली. शेतातील पिकं अक्षरशः कुजली आहे. अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. लहान मुलांचे वह्य पुस्तक सर्व काही पुरात वाहून गेले. त्यामुळे पूरग्रस्तांना मदतीची नितांत आवश्यकता आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने राज्यातील गरजू लोकांना १० कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने तयार केलेल्या प्रसिद्ध पत्रकात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

सिध्दीविनायक ट्रस्टकडून 10 कोटींच्या मदतीची घोषणा

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून राज्यातील पूरग्रस्तांना 10 कोटींची मदत जाहीर झाली आहे. सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून प्रसिद्धीपत्रक काढत याबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी एक व्हिडीओ जारी करतही याबाबत माबिती दिली आहे. “महाराष्ट्र राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे गंभीर पूरस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत जिल्हांतील नागरिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी श्रीसिध्दिविनायक गणपती मंदिर न्यासाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी रू. 10 कोटी देण्याचा निर्णय घेतला आहे”, असं प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे.

पुरग्रस्तांसाठी राज्यभरातून मदतीचा मोठा ओघ

विशेष म्हणजे मोठमोठ्या मंदिर ट्रस्टकडून कोट्यवधी रुपयांची मदत पूरग्रस्तांना दिली जात आहे. काल पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिराकडून मंदिर जाहीर झाली. तसेच शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानकडूनही मदत जाहीर झाली. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्र्स्टकडून मदत जाहीर झाली. यानंतर आता मुंबईच्या प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरर ट्रस्टकडून मदत जाहीर झाली आहे.

मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा सार्वजनिक गणेश मंडळाने पूरग्रस्तांसाठी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. शेगावच्या गजानन महाराज मंदिर ट्रस्टकडून १ कोटी ११ लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. आणि पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टने १ कोटी रुपयांची देणगी जाहीर केली आहे. शिर्डीची साईबाबा मंदिर ट्रस्टकडून १ कोटी रुपये आणि तुळजापूर मंदिर ट्रस्टकडून १ कोटी रुपयांची देणगी जाहीर करण्यात आली आहे.