राज्यातील काही भागांमध्ये विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात अजूनही अनेक भागांमध्ये पावसाचं प्रमाण असमान आहे. मराठवाड्यात अजूनही म्हणावा असा पाऊस पडला नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं आहे. आता शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी एक बातमी समोर आली आहे. हवामान विभागाच्या नव्या अंदाजामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
मराठवाड्यात पाऊस कमी; शेतकऱ्यांची चिंता वाढली!
मराठवाड्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला आहे, सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नाही, तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, दोन-तीन दिवसांत पुणे शहर आणि शहरालगत मोठा पाऊस होणार नाही, मात्र 20 तारखेच्या पुढे पावसाचा जोर वाढेल. असा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात येत आहे. मराठवाड्यात यंदा पावसाचं प्रमाण अत्यल्प आहे, शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत, मात्र अजूनही म्हणावा असा पाऊस पडलेला नाही. चांगला पाऊस पडला नसल्यानं शेतकरी संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत. परंतु सध्या तरी मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्यास अनुकूल वातावरण नसल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आल्यानं, शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये पावसात खंड पडल्यानं अनेक जिल्ह्यांमध्ये आता पिके सुकत असल्याचं चित्र आहे. जर वेळेवर पाऊस पडला नाही तर दुबार पेरणीचं सकंट निर्माण होऊ शकतं. त्यामुळे बळीराजाची चांगल्या पावसाची प्रतीक्षा कायम असल्याचे चित्र मराठवाड्यात सध्या आहे.
काही भागात पावसाची ओढ; दुबार पेरणीचे संकट
महाराष्ट्रात मान्सून सामान्यपणे सात जूनच्या आसपास दाखल होतो, मात्र यंदा 25 मे रोजीच मान्सूननं महाराष्ट्रात एन्ट्री केली. राज्यात मान्सूनची एन्ट्री होताच मुसळधार पावसाला सुरुवात झाली, राज्यातील अनेक भागांमध्ये त्यावेळी जोरदार पाऊस झाला, मात्र तीस मे नंतर पावसात काहीसा खंड पडला. त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार हजेरी लावली, पुन्हा एकदा 20 जूनच्या आसपास पावसानं ओढ दिली होती, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेच वातावरण निर्माण झालं होतं. अशीच परिस्थिती राहिल्यास मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश भागात शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येऊ शकते. त्यामुळे शेतकरी वर्गात सध्या चिंतेचे वातावरण आहे.





