Solapur Barshi Pattern : राजकारणात कधी काहीही होऊ शकतं याचा प्रत्यय सोलापुरात बार्शी तालुक्यात आला आहे. सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी भाजपविरोधात एकवटल्यात. या महाआघाडीनं जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणात खळबळ उडालीय. एकीकडे राज्याच्या राजकारणात उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत विस्तवही जात नाही. पाठिंबा देण्याच्या भास्कर जाधवांच्या घोषणेवरुन ठाकरे शिवसेनेतील ही दुफळीही समोर आली. हे सगळं घडत असताना दुसरीकडे सोलापुरात बार्शी तालुक्यात मात्र वेगळाच प्रकार घडलाय. जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी बार्शीत चक्क ठाकरे शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र आलेत.
शिवसेनेचा नवा बार्शी पॅटर्न?
1. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी ठाकरेंची शिवसेना आणि शिंदे शिवसेना एकत्र
2. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्हीही पक्ष आघाडीत सहभागी
3. दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादींची एकत्र महाआघाडी
4. ठाकरेंचे आमदार दिलीप सोपलांची महाआघाडीच्या मेळाव्याची माहिती
दोन्ही शिवसेना एकत्र येणार का?
महाआघाडीच्या सभेची जमवाजमव बार्शीत सुरु असताना, दुसरीकडे हा अधिकृत निर्णय नाही, असं संजय राऊत म्हणालेत. दुसरीकडे ठाकरे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांनीही या आघाडीला अनैतिक ठरवत तीव्र नाराजी व्यक्त केलीय. तर हे बार्शीतलं स्थानिक पातळीवरचं राजकारण आहे, याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतला जाईल असं शिंदेंच्या शिवसेनेकडून सांगण्यात येतंय. बार्शीतल्या या झेडपीच्या निवडणुका ठाकरे शिवसेनेचे आमदार दिलीप सोपल विरुद्ध भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्यात रंगलीय. या महाआघाडीवर भाजपनंही जोरदार टीका केली आहे. भाजपला हरवण्यासाठी पाच-पाच पक्ष एकत्र येतायत, अशा अनैसर्गिक युती लोक स्वीकारणार नाहीत. सोलापूर जिल्हा परिषदेत भाजपचाच अध्यक्ष होईल असं पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणालेत.
बार्शीत झालेली ही महाआघाडी स्थानिक समीकरण असल्याचं सांगत दोन्ही शिवसेनेच्या नेतृत्वानं यापासून अंतर राखलंय. मात्र हा नवा बार्शी पॅटर्न आगामी राजकारणाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. शिंदे शिवसेना आणि भाजपात सुरु असलेला संघर्ष आणि ठाकरे युतीत राज ठाकरेंनी वेगळी भूमिका घेण्याचे दिलेले संकेत यामुळं भविष्यात वेगळी राजकीय समीकरणं दिसतील. नव्या बदलांनंतर दोन्ही शिवसेनांनी एकत्र येण्याची राजकीय लवचिकता ठाकरे-शिंदे स्वीकारणार का, हा प्रश्न आहे.





