Marathi News

अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विशेष फेरी; इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

Written by:Rohit Shinde
Published:
राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. अशा विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी एक शेवटची संधी देण्यात आली आहे.
अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विशेष फेरी; इच्छुक विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

अद्याप अकरावीसाठीची प्रवेश प्रक्रिया सुरूच आहे. आता माध्यमिक व उच्च माध्यमिक अकरावीसाठी संचालनालयाने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अखेरची संधी देऊ केली आहे. राज्यभरात अकरावी प्रवेशासाठी अर्ज भरलेले सुमारे १० हजार विद्यार्थी अद्यापही प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. अकरावीत ऑनलाईन प्रवेश अद्याप ज्या विद्यार्थ्यांनी घेतलेला नाहीये त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. राज्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाहीये. अशा विद्यार्थ्यांना एक दिलासा देणारी बातमी आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेशासाठी आता शेवटची आणि अंतिम विशेष फेरी राबवण्यात येत आहे. त्यामुळे या संधीचा विद्यार्थ्यांना फायदा घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.

4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान विशेष फेरी

राज्यात अतिवृष्टी व पूर परिस्थिती निर्माण झाली होती. ही परिस्थिती तसेच विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्या 30 सप्टेंबर 2025 रोजी झालेल्या बैठकीतील निर्देश यांचा विचार करुन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थ्यांना अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची शेवटची संधी देण्यात आली आहे. 4 ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणाऱ्या या अंतिम फेरीची विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.

कशी असेल शेवटची विशेष फेरी?

4 ऑक्टोबर सकाळी 10 वाजेपासून ते 6 ऑक्टोबर दुपारी 3 वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना नवीन नोंदणीसह प्राधान्यक्रम भरणे, तसेच प्राधान्यक्रमात बदल करता येणार आहे. या फेरीमध्ये अर्ज भरताना विकल्प भरण्याची व नोंदणीची सुविधा अंतिमतः देण्यात येणार आहे. अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची ही अंतिम फेरी असून यानंतर संधी मिळणार नाही. अधिक माहितीसाठी मंडळाचे अधिकृत वेबसाईट https://mahafyjcadmissions.in ला भेट द्यावी अथवा ई-मेल आयडी- support@mahafyjcadmissions.in किंवा हेल्पलाईन नंबर 8530955564 वर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य शिक्षण मंडळामार्फत करण्यात आले आहे.ज्या विद्यार्थ्यांनी या फेरीमध्ये विकल्प भरले आहेत त्यांच्या प्राधान्यक्रम / विकल्पानुसार कनिष्ठ महाविद्यालय न मिळाल्यास केवळ अशा विद्यार्थ्यांना पुनश्चः रिक्त जागा दर्शवून रिक्त असलेल्या जागा विचारात घेऊन विकल्पात बदल करण्याची सुविधा देण्यात येणार आहे.

ही प्रवेशाची अंतिम मुदत असेल. या मुदतीनंतर विद्यार्थ्यांना पुढील संधी उपलब्ध करून दिली जाणार नाही, असे संचालनालयाने जाहीर केले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सावधगिरीने ही प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews