State government – राज्य सरकारकडून लोकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. राज्य शासनाच्या विविध विभागांकडून नागरिकांना सेवा पुरवल्या जातात. या सेवांसाठी आपले सरकार हे पोर्टल असून या पोर्टलवरील सर्व सेवा व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुरवण्यात याव्यात. तसेच सर्व सेवा योग्यप्रकारे आणि गरजेनुसार पुरवण्याच्यादृष्टीने सर्व तालुक्यांमध्ये एक रिंग तयार करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. वर्षा निवासस्थानी सेवा सुलभीकरणासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज राज्यातील नागरिक सेवांसंदर्भात आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
1001 सेवा पुरवण्याचे काम सुरु…
दरम्यान, राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी, अपर मुख्य सचिव (नियोजन) राजगोपाल देवरा, सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ.हर्षदीप कांबळे, माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव पराग जैन नैनुटीया आदी यावेळी उपस्थित होते. दरम्यान, आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून सध्या राज्यात 1001 सेवा पुरवण्याचे काम सुरू असून त्या पैकी ९९७ सर्व पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. गेल्या पंधरा दिवसामध्ये पोर्टलवर उपलब्ध असलेल्या सेवांमध्ये २३६ सेवांची वाढ झाली आहे.
नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल…
सेवा पुरवठ्याच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी त्रयस्थ संस्थेमार्फत नियमितपणे पडताळणी करण्यात यावी, तसेच अर्ज प्रक्रियेत लागणारी कागदपत्रांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यासाठी नियोजन करावे. सर्व जिल्हा परिषद, महापालिका आणि विद्यापीठांचे डॅशबोर्ड एकसमान असावेत, जेणेकरून राज्यभरातील नागरिकांना एकसंध अनुभव मिळेल, या सेवेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी रिंग व क्लस्टर प्रणाली राबवण्यात यावी. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एकाच प्रकारच्या 9 सेवा एकत्र करण्याचे निर्देश देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, रिंगमध्ये सुरवातीस त्या तालुक्यातील १० ते १२ गावांचा समावेश असावा व गरजेनुसार सेवा पुरवण्यात याव्यात.





