Marathi News

शासकीय आश्रमशाळांत शाळेच्या पहिल्या दिवशी “विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव”, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती

Written by:Astha Sutar
Published:
आदिवासी विकास विभागाच्या शासकीय आश्रमशाळेतील शिक्षकांची भरती लवकरच आगामी काळात करण्यात येणार आहे. अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे.
शासकीय आश्रमशाळांत शाळेच्या पहिल्या दिवशी “विद्यार्थ्यांचा प्रवेशोत्सव”, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची माहिती

Ashok Uike – सोमवारपासून (16 जून) राज्यातील शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे. या शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी राज्य सरकाराने पुढाकार घेतला आहे. शाळेच्या पहिल्या दिवशी आदिवासी विकास विभागातर्फे शासकीय आश्रमशाळा आणि अनुदानित आश्रमशाळांमध्ये “विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव” साजरा करण्यात येणार आहे. अशी माहिती आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिली आहे. 

फूल देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत…

दरम्यान, शाळेच्या पहिल्या दिवशी मतदारसंघातील खासदार, आमदार यांनी शासकीय शाळांमध्ये जाऊन शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करावे, असं राज्य सरकारने म्हटले आहे. राज्यातील नाशिक, ठाणे, पालघर या ठिकाणी १६ जून रोजी शासकीय आश्रमशाळा सुरु होणार आहेत. विशेष म्हणजे शाळेच्या पहिल्या दिवशी “विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेशोत्सव” उपक्रमात मंत्री, खासदार, आमदार हे राज्यातील विविध आश्रमशाळांमध्ये उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. आदिवासी विकास विभागांतर्गत राज्यात एकूण ४९७ शासकीय आश्रमशाळा आहेत. तर अनुदानित आश्रमशाळा ५५४ आहेत.

शिक्षक व परिचारीका भरती करणार…

दरम्यान, उच्च माध्यमिक शिक्षक २२९, माध्यमिक शिक्षक ४५५, पदवीधर प्राथमिक शिक्षक १२०, प्राथमिक शिक्षक इंग्रजी १७८, प्राथमिक शिक्षक मराठी ८०९ असे एकूण १७९१ शिक्षक भरती लवकरच करण्यात येईल, विभागाच्या शासकीय आश्रमशाळांत १७९१ शिक्षकांची पदे बाह्यस्त्रोताद्वारे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे. तसेच शासकीय आश्रमशाळांत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी परिचारीका (नर्सेस) यांची एकूण ४९९ बाह्यस्त्रोताद्वारे भरती केली जाणार आहे. असं यावेळी मंत्री अशोक ऊईके यांनी सांगितले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews