मुंबई- राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शेतीमुळे झालेल्या नाहीत, त्यासाठी वेगळी कारणं आहेत, हे पद्मश्री श्रीरंग लाड यांचं वक्तव्य वादात सापडलंय. शएतकऱ्यांनी आत्महत्येला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि यामुळे शएती बदनाम झाल्याचंही मत त्यांनी व्यक्त केलंय. तर लाड यांना वास्तव माहित नाही का, असा सवाल आता शेतीक्षेत्रातील तज्ज्ञ आणि विरोधक करतायेत.
कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल परभणीतील कृषीतज्ज्ञ आणि शेतकरी श्रीरंग उर्फ दादा लाड यांना मानाचा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पुण्यात संवाद साधताना दादा लाड यांनी शेतकरी आत्महत्यांबाबत केलेल्या विधानांमुळे वाद निर्माण झालाय.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतीमुळे नाहीत – दादा लाड
राज्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या शेतीमुळे होत नाहीत असा दावा त्यांनी केलाय.
१. मराठवाड्याला पर्याप्त पाणी इथं पडतं.
२. शेतीमुळे आत्महत्या होत नाहीत, हे शेतीच्या खात्यावर का टाकतात?
3. आत्महत्या झालेल्या शेतकऱ्याच्या गावात गेलो तर लक्षात येतं की, आत्महत्येला निराळी कारणं आहेत
४. शेतीच्या खात्यावर आत्महत्या जमा केल्या, आत्महत्येलाही प्रतिष्ठा प्राप्त करून दिली
५. शेती हे आत्महत्या करण्याचं क्षेत्र नाही. आनंदाने जगण्याचं क्षेत्र आहे.
६. आत्महत्या या शेतीमुळे अजिबात झाल्या नाही. पण, मध्यंतरी कर्जामुळे आत्महत्या झाल्याची प्रकरणं आहेत.
७. शेतीला बदनाम करण्याचं काम या सगळ्यांनी केलं आहे.
८. आत्महत्या करावे असं चित्र नाही. हजारो वर्ष आम्ही शेती करतोय.
९. शेतकरी दुष्काळात सापडला, उत्पन्न घटलं, पण आत्महत्या केली नाही.
१०. आत्महत्या करून जीवन संपवणं यासाठी टोकाचं घडावं लागतं, शेती हे आत्महत्येचं कारण नाही.
दादा लाड यांच्या विधानावर नाराजी
पद्मश्रीनं सन्मानित श्रीरंग दादा लाड यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांनी आणि अर्थतज्ज्ञांनीही या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केलीय. दादा लाड म्हणतात ते जर योग्य असेल तर २०१४ साली तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर शेतकऱ्यांवरुन नरेंद्र मोदी का टीका करत होते, असा सवाल कृषीतज्ज्ञ विजय जावंधिया यांनी विचारलाय. तर दादा लाड यांचं वक्तव्य चुकीचं असून शेतकरी तोट्यात शेती करतोय, असं मत कृषीतज्ज्ञ बुधाजीराव मुळीक यांनीही व्यक्त केलंय. शेतकऱ्यांच्या आत्महत्येला सरकार जबाबदार असल्याची टीकाही त्यांनी केलीय.
विरोधकांचं टीकास्त्र
राजकीय क्षेत्रातही या वक्तव्यावर प्रतिक्रिया उमटल्या आहेत. शेतीत होणारं नुकसान, त्याकून येणारा कर्जबाजारीपणा हीच शेतकरी आत्महत्यांची प्रमुख कारण असल्याचं विरोधकांचं म्हणणंय. मराठवाड्यात गेल्या वर्षभरात ११०० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे सत्य लाड यांना माहिती नाही का, असा सवाल विरोधक करतायेत.
वास्तव काय आहे?
सातत्यानं होणारा निसर्गाचा प्रकोप, अवकाळी पाऊस, हवामानातील बदल, कधी दुष्काळ तर कधी अतिवृष्टी याचा सामना महाराष्ट्रातील शेतकरी करतो, हे वास्तव आहे.
त्यासोबतच शेतीत केलेल्या कामाला आणि पिकाला मिळणारं मोल हे अत्यंत तोकड्या स्वरुपाचं आहे.
राज्याच्या अनेक भागात शेती हा आतबट्ट्याचा व्यवसाय झालेला आहे. यातही काही मोजके शेतकरी चांगलं उत्पादनही घेतायेत, त्यासाठी गुंतवणूकही तितक्याच प्रमाणात करावी लागतेय. ही सत्य स्थिती असताना आत्महत्या शेतीमुळे होतच नाहीत, हा दादा लाड यांचा दावा वादात सापडलेला दिसतोय. या निमित्तानं का होईना पण शेतकरी आत्महत्येचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय





