सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रिपदाची संधी देत भाजपानं संपूर्ण मदत आहे. अजित पवार यांच्या पक्षावर पकड मिळवण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शरद पवार यांचा निर्णय प्रक्रियेत सहभाग नको, अशी भाजपची यामागची भूमिका आहे का, असा सवालही उपस्थित होतो आहे.
अजित पवारांच्या अंत्यविधीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातील भाजपाची नेतेमंडळी पाहायला मिळाली. पवार कुटुंबीय जो निर्णय घेतील त्याप्रमाणे पुढील रचना असेल असं थेट मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण होणार, याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु होती. या विलिनीकरणाचं स्वागतही भाजप नेते करत होते. मात्र अजित पवारांनंतरच्या राजकारणात शरद पवारांशी चर्चा करण्याचं मात्र भाजपानं टाळलं. शरद पवारांचा राज्याच्या राजकारणातील हस्तक्षेप टाळण्यासाठी भाजपची ही खेळी आहे का अशीही चर्चा रंगतेय.
शरद पवारांची कोंडी, कुणाची खेळी?
1. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर शरद पवार एनडीएत येणार असल्याची चर्चा
2. केंद्रात शरद पवारांच्या 8 खासदारांचा एनडीएला पाठिंबा मिळण्याची शक्यता
3. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवारांचे चांगले संबंध
4. अजित पवारांच्या मृत्यूनंतर शरद पवारांच्या पुढच्या भूमिकेबाबत भाजपला संशय
5. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करण्यात भाजपचा अदृश्य हात
6. प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्याशी भाजपची चर्चा
7. निर्नायकी अवस्थेत असलेल्या दादांच्या राष्ट्रवादीवर भाजपचं आडून नियंत्रण
शरद पवारांना दूर ठेवण्यात भाजपला यश?
सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्रीपद देत शरद पवारांना आणि त्यांच्या साथीदारांना सत्तेपासून दूर ठेवण्यात आणि अस्वस्थता वाढवण्यात भाजपला यश आल्याचं मानण्यात येतंय. राज्याचं अर्थखातं अजित पवारांकडे होतं, आता ते भाजपकडे येण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवारांना नेतृत्व देत त्यांच्यासोबतचे ज्येष्ठ सहकारी मनानं भाजपसोबत राहतील, अशीही व्यवस्था भाजपनं केली असण्याची शक्यता आहे. भाजपच्या या खेळीचे परिणाम दोन्ही राष्ट्रवादीतल्या संघर्षात आगामी काळात दिसतील. विलिनीकरणाचा मुद्दाही बाजूला पडण्याची शक्यता आहे. पुढच्या विधानसभेपर्यंत या खेळीची फळं भाजपला कोणत्या स्वरुपात मिळणार, हे आता पाहावं लागणार आहे.





