ठाकरे आणि भाजपात अदानींवरुन जुंपली, मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, ठाकरेंचा आरोप, राणे म्हणाले..

Written by:Smita Gangurde
Published:
मुंबई महापालिकेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपा-शिंदे सेना विरुद्ध ठाकरे युती हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाताना दिसतोय.
ठाकरे आणि भाजपात अदानींवरुन जुंपली, मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव, ठाकरेंचा आरोप, राणे म्हणाले..

मुंबई – मुंबईत महापालिका निवडणुकांचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी टोकदार झालेल्या आहेत. अशात शिवाजी पार्कमध्ये झालेल्या मुंबईतील ठाकरे युतीच्या सभेत अदानींवरुन राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केलीय.

गेल्या दहा वर्षांत अदानींना मुंबईत आणि भारतात किती सरकारी कंत्राटं मिळाली, याचा व्हिडिओच राज ठाकरेंनी या सभेत दाखवला. अदानींच्या निमित्तानं मुंबईतील जागा गिंळकृत करुन मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.

काय म्हणाले राज ठाकरे?

2014 सालानंतर उद्योगपती गौतम अदानी यांना कसं मोठं करण्यात आलं, याचा पाढाच राज ठाकरेंनी शिवाजी पार्कच्या सभेत वाचून दाखवला. 2014 पर्यंत सिमेंट क्षेत्रात नसलेले अदानी आता त्याच क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर कसे आले, असा सवालही राज यांनी उपस्थित केला. अदानींनी मोठं उद्योगपती होण्यास विरोध नाही, मात्र इतक्या सगळ्या उद्योगपतींमध्ये अदानीच का, असा सवालही त्यांनी विचारला.

देशातील सगळी बंदरं, विमानतळं, मोठे सार्वजनिक बांधकाम प्रकल्प हे अदानींना आंदण देण्यात येत असल्याची टीकाही राज ठाकरेंनी यावेळी केली. देशातील आर्थिक राजधानी असलेलं मुंबई शहर एका विशिष्ट गटाच्या ताब्यात देण्यात येत असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला.

पालघरमध्ये सुरु असलेल्या वाढवण बंदराच्या कामावर, विमानतळाच्या घोषणेवरही त्यांनी भाष्य केलं. पालघर परिसरात विकास घडवून आणत तिथे लोकसंख्या उभी करायची, मुंबईचं महत्त्व कमी करत तो भाग जवळच्या गुजरातला जोडायचा आणि अप्रत्यक्षरित्या मुंबईवर कब्जा मिळवण्याचा गुजरातचा हा लाँग टर्म डाव असल्याची टीकाही त्यांनी केली. हा मुंबईच्या भवितव्याचा प्रश्न असल्याचं सांगत त्यांनी मतदारांना भावनिक आवाहनही केलं.

ममदानी चालतो, अदानी नाही- भाजपाचं प्रत्युत्तर

ठाकरे बंधूंच्या सभेतील या टीकेला भाजपाचे मंत्री नितेश राणेंनी प्रत्युत्तर दिलंय. ठाकरेंना अदानी चालत नाहीत मात्र चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो, अशी टाका करत मुंबईकरांनी सावध राहावं, अशी एक्स पोस्ट नितेश राणे यांनी केलीय.

मुंबई महापालिकेच्या अखेरच्या टप्प्यात भाजपा-शिंदे सेना विरुद्ध ठाकरे युती हा संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होत जाताना दिसतोय. अदानींच्या मुद्द्यावर ठाकरे बंधू भाजपाला घेरण्याच्या प्रयत्नात आहेत. तर हिंदू-मुस्लीम या ध्रुवीकरणातून भाजपा मतदारांना आवाहन करु पाहतंय. आता मुंबईतील मतदार नेमकी कुणाला साथ देणार हे पाहावं लागणार आहे.

Follow Us :GoogleNews