मुंबईत ठाकरेंसह मविआला काँग्रेसचा खोडा, काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी गमावल्या 30हून जास्त जागा

Written by:Smita Gangurde
Published:
वर्षा गायकवाड यांच्या हट्टामुळे काँग्रेसनं स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला, यात मविआचं नुकसान झाल्याची चर्चा आहे.
मुंबईत ठाकरेंसह मविआला काँग्रेसचा खोडा,  काँग्रेसमुळे ठाकरे बंधूंनी गमावल्या 30हून जास्त जागा

मुंबई– काँग्रेसनं स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला नसता, तर ठाकरेंसह मविआला विजय मिळाला असता, अशा चर्चा सध्या सुरु आहेत. त्यातच मतदानाच्या आकडेवारीनुसार ठाकरे युतीच्या 30हून अधिक जागा काँग्रेस स्वतंत्र लढल्यानं पडल्याचं समोर आलंय. वर्षा गायकवाड यांच्या हट्टामुळे ठाकरे आणि मविआचं नुकसान झाल्याचं आता सांगण्यात येतंय

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर आता निकालांचं विश्लेषण होतंय. काँग्रेसनं मनसेसोबत मविआत जाण्याचं टाळत. मुंबई महापालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला.या निर्णयाचा फटका ठाकरे बंधूंना बसल्याचं दिसतंय. ठाकरेंच्या 30 पेक्षा जास्त जागा मविआ एकत्र नसल्यानं फुटल्याचं समोर आलंय.

काँग्रेसच्या सवत्यासुभ्यामुळे मविआचं नुकसान

मुंबईत स्वबळावर लढण्याचा काँग्रेसचा निर्णय , मनसेसोबत जाण्याचं काँग्रेस नेतृत्वानं टाळलं यामुळं निकालावर याचा मोठा परिणाम झालेला पाहायला मिळाला. निवडणूक निकालात मुंबई महापालिकेत काँग्रेसला 24 जागा मिळाल्या. काँग्रेस आणि मविआ एकत्र लढले असते तर ते युतीवर मात देण्यासाठी पुरेसं संख्याबळ मिळालं असतं. मात्र प्रत्यक्षात ते घडलं नाही.  ठाकरे बंधूंचे 30 हून अधिक उमेदवार केवळ या मतविभाजनामुळे पडले

मतविभाजनामुळे ठाकरे युतीचे उमेदवार पडले

या पडलेल्या उमेदवारांच्या वॉर्डात काँग्रेस आणि ठाकरेंची मतं ही विजयी उमेदवारापेक्षा जास्त आहेत.

मतविभाजनामुळे पडलेले उमेदवार
1. वॉर्ड क्रमांक 1- फोरम परमार, ठकरे शिवसेना
2. वॉर्ड क्रमांक 7- सौरभ घोसाळकर, ठाकरे शिवसेना
3. वॉर्ड क्रमांक 20- दिनेश साळवी, मनसे
4. वॉर्ड क्रमांक 23- किरण जाधव, मनसे
5. वॉर्ड क्रमांक 26 – धर्मेंद्र काळे, ठाकरे शिवसेना
6. वॉर्ड क्रमांक 52- सुप्रिया गाढवे, ठाकरे शिवसेना
7. वॉर्ड क्रमांक 57- रोहन शिंदे, ठाकरे शिवसेना

या नावांसह अनेक ठाकरे शिवसेना आणि  मनसेच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला.

वर्षा गायकवाडांचा हट्ट कारणीभूत 

वर्षा गायकवाड यांच्या हट्टामुळे काँग्रेसनं स्वबळावर जाण्याचा निर्णय घेतला, यात मविआचं नुकसान झाल्याची चर्चा आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मात्र हे आरोप फेटाळलेत. यापूर्वी मुंबईत शिवसेनेविरोधातच काँग्रेस लढत असल्याचं त्यांचं म्हणणंय. तर यातून धडा घेत भविष्यात मविआ आणि विरोधकांनी एकत्र येण्याची गरज संजय राऊत व्यक्त करतायेत.

मुंबई काँग्रेसमध्ये अस्वस्थता 

दुसरीकडे मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढूनही चांगलं यश मिळालं नसल्याची टीका पक्षातूनच होतेय.2017 च्या निवडणुकीत काँग्रेसला 31 जागा मिळाल्या होत्या, त्या यंदा घटून 24 वर आल्यात. याची जबाबदारी घेत काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या राजीनाम्याची मागणीही होतेय. मात्र यावरही मतमतांतरं आहेत.

काँग्रेस श्रेष्ठी काय निर्णय घेणार? 

संघटना वाढण्यासाठी काँग्रेसनं मुंबईत स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला मात्र त्यात काँग्रेस आणि ठाकरेंचं नुकसान झालंय. वर्षा गायकवाड यांच्या मतदारसंघात 8 पैकी 6 प्रभागात शिंदे शिवसेना आणि भाजपानं बाजी मारलीय. स्वबळावर लढण्याच्या निर्णयानं काँग्रेसनं महायुतीला मदत केल्याची टीका होतेय. महापालिका निकाल आणि त्यानंतर सुरु झालेल्या या वादाचे मुंबई काँग्रेसमध्ये काय पडसाद उमटणार, हे आता पाहावं लागणार आहे.

 

Follow Us :GoogleNews