ठाणे दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरविल्याबद्दल कळव्यात एकाला अटक

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
नोव्हेंबर 2024 ते मार्च 2025 या कालावधीत आरोपीने पाकिस्तान इंटेलिजन्स ऑपरेटिव्ह सोबत एका महत्त्वाच्या ठिकाणची संवेदनशील माहिती व्हाट्सअपद्वारे शेअर केली. या कारणामुळं दहशतवाद विरोधी पथकाकडून आरोपीला अटक करण्यात आलेय.
ठाणे दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई, पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरविल्याबद्दल कळव्यात एकाला अटक

Thane Crime – भारत पाकिस्तान युद्धानंतर देशातील पाकिस्तानी व बांग्लादेशी नागरिकांची कसून तपासणी सुरु असून, पाकिस्तानी नागरिकांना त्यांच्या देशात पाठवले जात आहे. तर जे संशयित असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, याचाच एक भाग म्हणून ठाण्यातील दहशतवाद विरोधी पथकाची मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तान गुप्तचर यंत्रणेला संवेदनशील माहिती पुरवल्याबद्दल ठाण्यातील कळवा भागात राहणाऱ्या  एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.

पाकिस्तानी एजंटने हनी ट्रॅपमध्ये अडकवले…

दरम्यान, सदर आरोपीचे नाव उघड करण्यात आले नाही. मात्र आरोपी मुंबईतील एका महत्वाच्या संस्थेसाठी काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. एका पाकिस्तानी एजंटने आरोपीला हनी ट्रॅपमध्ये अडकवल्याची माहिती मिळाली आहे. आरोपीला महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली ठाण्यातून अटक केली आहे.

तिघांविरोधात गुन्हा दाखल…

या प्रकरणी संशयित इसम व त्याच्या संपर्कातील इतर २ व्यक्ती अशा एकूण ३ इसमांविरूध्द दहशतवाद विरोधी पथक पोलिस ठाणे येथे शासकीय गुपिते अधिनियम १९२३ चे कलम ३ (१) (ब), ५ (अ) सह भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ६१ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयात संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून, दहशतवाद विरोधी पथकाकडून पुढील तपास करण्यात येत आहे. आणि चौकशी करण्यात येत आहे.