Congress – राष्ट्रवादी काँग्रेस (शदरचंद्र पवार) पक्षाचे परभणी जिल्ह्यातील तीन वेळचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांच्यासह शेकोडो कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सध्या ‘महाराष्ट्र धर्म‘ वाचवण्याची गरज असून, बाबाजानी दुर्राणी यांनी देशाला जोडणारा, महाराष्ट्र धर्म वाचवणारा विचार निवडला आहे. येणारा काळ हा काँग्रेसचा असेल. असे सांगून बाबाजानी दुर्राणी यांच्या काँग्रेस प्रवेशाने परभणी जिल्हा व मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला अधिक बळ मिळेल, असा विश्वास सपकाळ यांनी व्यक्त केला.
भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच…
सध्या देशात दोन विचारधारा असून समतेचा, संविधानाचा सर्वांना सोबत घेऊन जाणारा एक विचार आहे. आणि दुसऱ्या बाजूला संविधान व लोकशाही न माननारा हुकूमशाही व ‘हम दो हमारे दो’, हा विचार आहे. भारताचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे. देशात व राज्यात सध्या अराजक पसरलेले आहे, एका उद्योगपतीसाठी देशाला वेठीस धरले जात आहे, तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यात धुमश्चक्री सुरु असल्याची टिका यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नागपूर शहर उपाध्यक्ष शिव लिलाधर बेंडे, नागपूर अल्पसंख्याक सेलचे NCP (SP) अध्यक्ष रिजवान अन्सारी आदींनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यापुढे काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी रांगा लागतील…
दुर्राणी हे लोकनेते आहेत, त्यांच्या काँग्रेस प्रवेशाने मराठवाड्यात काँग्रेस पक्षाला उज्ज्वल भविष्य आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात इनकमिंग सुरु झाले असून यापुढे काँग्रेस पक्षात प्रवेशासाठी रांगा लागतील असेही अमित देशमुख म्हणाले. तसेच सोनियाजी गांधी, राहुलजी गांधी, प्रियंकाजी गांधी, मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बाबाजानी दुर्राणी यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे, असं माजी मंत्री अमित देशमुख म्हणाले. भाजपा युती सरकारमध्ये अल्पसंख्याक, ओबीसी व मागासवर्गीय समाज सुरक्षित नाही.
महाराष्ट्र हे छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे पुरोगामी राज्य आहे आणि मी व माझे सहकारीही याच विचाराचे आहोत. असं दुर्राणी म्हणाले.





