नदीजोड प्रकल्प क्रांतीकारक ठरणार, केंद्राकडून किती कोटीची मदत मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितले?

Written by:Astha Sutar
Published:
नदीजोड प्रकल्प क्रांतीकारक ठरणार, केंद्राकडून किती कोटीची मदत मिळणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय सांगितले?

Devendra Fadnavis – शेतकऱ्याला अतिवृष्टीच्या संकटातून सावरण्यासाठी आराखडा तयार करण्यात येत असून, लवकरच भरीव मदत करण्यात येईल, यात केंद्र सरकारचेही सहकार्य मिळेल. असेही मुख्यमंत्री म्हणाले. आज लोणी येथे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील व पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या नूतनीकरण शुभारंभ प्रसंगी फडणवीस बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री अमित शहा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आदी उपस्थित होते.

विखे-पाटीलांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली

दरम्यान, आशियातील पहिला सहकारी साखर कारखाना असलेल्या प्रवरानगर येथील सहकारी साखर कारखान्याने १० हजार टीपीडीपर्यंत आता मजल मारली आहे. ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांनी महाराष्ट्रात सहकाराची चळवळ रुजवली आणि आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी जल नियोजनाच्या संदर्भात महाराष्ट्रात जागृती घडवून आणली. या दोघांच्या पूर्णाकृती पुतळ्यांचे अनावरण हे ‘पद्मस्मरण’ आहे असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. असंही मुख्यमंत्री म्हणाले.

जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविली

पद्मभूषण बाळासाहेब विखे-पाटील यांनी सहकार चळवळ पुढे नेण्यासोबत जलसंवर्धन चळवळ महाराष्ट्रात रुजविण्याचे कार्य केले. राज्य शासनाने त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नदीजोड प्रकल्प राबविण्याचा आणि त्यातून राज्यातील दुष्काळ दूर करण्याचा निश्चय केला आहे. विदर्भामध्ये वैनगंगा – नळगंगा, तापीच्या खोऱ्यामध्ये पाणी आणायचं काम, उल्हास खोऱ्यातले समुद्रात वाहून जाणारे ५४ टीएमसी पाणी उचलून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणून आणि गोदावरीच्या खोऱ्यातला दुष्काळ दूर करण्याचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल सुरू आहे.

सहकारच्या बळकटीसाठी ८ ते १० हजार कोटींची मदत

राज्यातल्या सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी ८ ते १० हजार कोटींची मदत देण्यात आली. सहकार चळवळ रुजविण्याचे कार्य केंद्र सरकारच्या चांगल्या निर्णयाने होत आहे. साखर कारखान्याच्या सर्क्यूलर इकॉनॉमी विकसित करण्यासाठी आता प्रयत्न करावे लागतील. साखर कारखान्याचा मालक शेतकरी आहे, म्हणून त्याच्या पाठीशी शासन उभे राहील, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. पुढच्या पाच ते सात वर्षात टप्प्या टप्प्यानं हे संपूर्ण पाणी गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणल्यानंतर नाशिक, अहिल्यानगर परिसर आणि मराठवाड्याचा दुष्काळ भूतकाळ असेल असे कार्य राज्य शासन करेल, असे मुख्यमंत्री विश्वासाने म्हणाले.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews