Uddhav Thackeray – देशासह राज्यात थापा मारून सरकार आले आहे. सत्तेच्या नादाला लागून भले भले बिघडलेले असून भाजपची सत्ता जाण्याच्या दिवसात तिथे गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आता कपाळावर हात मारायची वेळ आली आहे, अशी जोरदार टिका उद्धव ठाकरे यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराला वेग आला असून, मंगळवारी सत्ताधारी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवसेनेत (ठाकरे) प्रवेश केला. यावेळी ठाकरेंनी भाजपावर टिका केली.
शेतकऱ्यांना आंदोलन करु दिले नाही
दिल्लीमध्ये जे घडले ते म्हणजे देशाच्या इतिसाहात प्रथमच इतक्या मोठ्या संख्येने खासदारांना अटक करण्यात आली. मतांची चोरी करून जे लोक सत्तेत बसले आहेत, ती चोरी आपण उघड केली आणि त्याबद्दल जाब विचारायला जात होते. म्हणून त्यांना जाऊ न देता अटक केली. मग हे कुणाचे सरकार आहे? अशी विचारणा करत दोन तीन वर्षांपूर्वी शेतकरी त्याच्या न्याय हक्कासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या मार्गामध्ये सगळे खिळे पसरले गेले, मोठ्या बॅरिगेट्स टाकल्या गेल्या.
जनतेच्या न्याय हक्कासाठी लढत राहू!
शेतकऱ्यांनी दिल्लीत जायचे नाही. जे खासदार जनतेने निवडून दिले आहेत, त्यांनी सरकारला प्रश्न विचारायचे नाहीत. आपण जर पुराव्यानिशी त्यांचा भ्रष्टाचार वेशीवर टांगले तर त्या मंत्र्यांवर कारवाई करायची नाही. त्यामुळे आपण आणखी किती दिवस हे सहन करायचे, असा संताप व्यक्त करत जनतेच्या न्यायहक्कासाठी आपण लढत राहू हीच एक प्रतिज्ञा घेऊन आपण मैदानात उतरलेलो आहोत, असेही उद्धव ठाकरे यांनी नमूद केले.
भ्रष्टाचार एवढ्या उघडपणे सुरू
तसेच आगामी निवडणुकीमध्ये ताकदीने काम करण्याचे आवाहन पदाधिकाऱ्यांना केले. आपण लढणारी माणसे आहोत, आपल्याला सत्तेचा मोह किंवा लालूच बिलकुल नाही. परंतु सोमवार हा दिवस देशाच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. महाराष्ट्रात जे काही सुरू आहे, ते आपण पाहत आहोत आणि भोगत आहोत. भ्रष्टाचार एवढ्या उघडपणे सुरू आहे की महाराष्ट्रात जणू काही बेबंदशाही सुरू असल्याची प्रचिती येते.





