मुंबईत मराठा आंदोलकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न; वाहतूक व्यवस्था कोलमडली!

Written by:Rohit Shinde
Published:
नव्याने मुंबईत दाखल होण्यासाठी आलेल्या आंदोलकांची वाढती संख्या पाहता वाशीच्या एक्झिबिशन सेंटर येथील पार्किंगची मर्यादा संपली आहे. आंदोलकांचा मुंबईकडे येण्याचा ओघ अद्यापही सुरूच आहे.
मुंबईत मराठा आंदोलकांच्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न; वाहतूक व्यवस्था कोलमडली!

मराठा आंदोलकांनी आझाद मैदानात मोठ्या प्रमाणावर गर्दी केली आहे. मात्र एक दिवसाची आणखी परवानगी वाढवून दिल्याने काहींनी या ठिकाणीच थांबण्याचा निर्णय घेतला. हळूहळू अजूनही मराठा आंदोलक जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत आहेत. सातत्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे वाशी, मुलुंडचे टोलनाका तसेच आझाद मैदान परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. यामध्ये सर्वसामान्य मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाला सामोर जावे लागत आहे.

मुंबईच्या रस्त्यांवर मोठी वाहतूक कोंडी

मराठा आंदोलक हे आझाद मैदान सोडून चक्क मुंबई महापालिकेच्या समोर येऊन ठिय्या आंदोलन करत आहेत. यामुळे मोठी वाहतूककोडीं झाल्याचे बघायला मिळतंय. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला जातोय. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मोठी वाहतूककोडीं झाल्याचे सध्या बघायला मिळत आहे. आंदोलकांनी पूर्ण रस्ता चाम केला आहे.

आंदोलनात सहभागी समर्थक राहण्याची व खाण्याची व्यवस्था करत मोठ मोठे ट्रक आणि वाहने मुंबई शहराच्या दिशेने आणत असल्याने काही ठिकाणी वाहतूककोंडी झाली. पार्किंग मिळत नसल्याने महामार्गावर आंदोलनकर्त्यांनी वाहने पार्क केल्याने मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहतूकीवर परिणाम होत असून जाम झाले. मुंबईतील नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. यामुळे सर्वसामान्य मुंबईकर मात्र वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत.

पार्कींग्स अपुरी; वाहतूक व्यवस्था कोलमडली!

काल मुंबईत आलेल्या वाहनांना मुंबईत पार्किंगसाठी जागा उपलब्ध नसल्याने काही आंदोलकांची वाहने फ्री वेवरच पार्क करण्यात आली. आंदोलन अद्यापही सुरू असल्याने आंदोलकांचा मुंबईकडे येतानाचा ओघ वाढतच आहे. आंदोलक आपपल्या वाहनाने आंदोलन स्थळी येत आहेत. त्यामुळे नवी मुंबईतील वाशीच्या टोलनाक्यापर्यंत ही वाहतूक कोंडी झाल्याचे चित्र आहे. ज्या आंदोलकांना मुंबईत पार्किंगसाठी जागा मिळाली नाही त्यांनी वाशी मार्केटमध्येच आपली वाहने पार्क केली आहेत. यामुळे पुढे हे चित्र आणखी बिघडण्याची शक्यता यामुळे निर्माण झाली आहे. नव्याने मुंबईत दाखल होण्यासाठी आलेल्या आंदोलकांची वाढती संख्या पाहता वाशीच्या एक्झिबिशन सेंटर येथील पार्किंगची मर्यादा संपली आहे. आंदोलकांचा मुंबईकडे येण्याचा ओघ अद्यापही सुरूच आहे.