मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न हा नेहमीच ज्वलंत विषय राहिलेला आहे. अशा परिस्थितीत आता यंदा गणेशोत्सव तोंडावर आला आहे. महामार्गाचे काम अपूर्ण असल्याने रस्त्यावर काही किमीच्या रांगा लागताना दिसत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावर रविवारी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. सुट्टीसाठी कोकणातले नागरिक गावी जात असतात या काळात ही परिस्थिती निर्माण झालेली आहे.
मुंबई-गोवा मार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न
खरंतर आज माणगाव इंदापूर परिसरात तब्बल ४ किलोमीटरपर्यंत वाहनांची लांबच लांब रांग लागली असून प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गणेशोत्सवानंतर मिळालेल्या तीन दिवसांच्या सुट्टीसाठी मोठ्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झाले होते. सुट्टी संपत आल्यानंतर रविवारी सकाळपासून परतीच्या प्रवासासाठी निघालेल्या वाहनांच्या गर्दीमुळे महामार्गावर तुफान कोंडी झाली आहे. माणगाव रेल्वे स्थानक परिसरापासून ते मुगवली गावापर्यंत चार किलोमीटरचा प्रवास करण्यास वाहनधारकांना तासन् तास वेळ लागत आहे.
कोंडीमुळे महामार्गावरील एस.टी. बस, खासगी वाहने, दुचाकी तसेच मालवाहतूक करणारी ट्रक-टेम्पो यांची मोठी गर्दी झाली आहे. महामार्गावरील अनेक ठिकाणी वाहनं आडवी-तिडवी उभी राहिल्याने कोंडी अधिकच वाढली आहे. पावसामुळे रस्त्यांवर निसरडेपणा असून त्यामुळे वाहनांचा वेग मंदावला आहे.या अनुषंगाने वाहतूक पोलिसांकडून कोंडी सोडविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त पोलीस कर्मचारी तैनात करून वाहनांना वळविणे, सिग्नलचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन वाहनधारकांना करण्यात येत आहे.
गणेशोत्सवात नागरिकांची डोकेदुखी वाढणार!
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा उत्सव असल्याने हजारो नागरिक मुंबईहून आपल्या गावी जाण्यासाठी निघतात. मात्र २०२५ मधील गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामे आणि विलंबित प्रकल्प यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढणार आहे. अनेक ठिकाणी रस्त्याचे काम पूर्ण झालेले नसल्याने वाहनचालकांना लांबच लांब ट्रॅफिक जामला सामोरे जावे लागते. पावसाळ्यात खड्डेमय रस्ते, अपूर्ण पूल आणि पर्यायी मार्ग यामुळे प्रवास वेळखाऊ व त्रासदायक ठरत आहे. गणपतीत कोकणात जाणाऱ्या गाड्यांची संख्या प्रचंड वाढते, त्यामुळे वाहतूक कोंडी अधिक तीव्र होते. प्रवासी तासन्तास रांगेत अडकतात, तसेच अपघातांचा धोका वाढतो. नागरिकांनी प्रवासासाठी पुरेसा वेळ ठेवणे, आवश्यक वस्तू बरोबर घेणे आणि संयम राखणे गरजेचे आहे. शासन व प्रशासनाने महामार्गाच्या कामाला गती देऊन तात्पुरत्या सोयीसुविधा उपलब्ध केल्यासच कोकणात जाणाऱ्या भाविकांचा त्रास कमी होईल.





