Transport Department : विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतूकीसह रोजगाराच्या संधीसाठी परिवहन विभागाकडून स्कूल व्हॅन नियमावली आणण्यात येत आहे. शालेय (स्कूल) बसचे वाढीव मासिक दर परवडत नसल्याने आपल्या मुलांच्या वाहतूकीसाठी अनधिकृत रिक्षाचा पर्याय निवडणाऱ्या पालकांना राज्य शासनाकडून दिलासा मिळणार आहे. ही नियमावली अंतिम करून याबाबत तातडीने अधिसूचना जारी करावी, असे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. परिवहन आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत स्कूल व्हॅन बाबत सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी परिवहन मंत्री बोलत होते.
नियमावली सुटसुटीत करावी…
दरम्यान, नियमावली मध्ये परिवहन समित्यांचे सक्षमीकरण, महिन्यातून एकदा समितीची बैठक होणे, प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी एक नोडल अधिकारी नेमणे अंतर्भूत असावे. अत्याधुनिक सुरक्षा व सुविधांनी युक्त असलेली अधिकृत स्कूल व्हॅन विद्यार्थ्यांना उपलब्ध होण्यासाठी आधीच्या नियमात बदल करण्यात येऊन नियमावली सुटसुटीत करावी. स्कूल व्हॅनचे भाडे मासिक तत्वावर आणि वर्षाच्या १० महिने कालावधीपर्यंतच घेण्याबाबत बंधन असावे. स्कूल बस भाडे परवडत नसलेले पालक विद्यार्थी वाहतूकीसाठी अवैध रिक्षाचा पर्याय अवलंबतात.
चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक…
चारचाकी १२+१ आसनापर्यँत विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी वाहनाला शालेय व्हॅनचा दर्जा देण्यात येणार आहे. सदर वाहने BS-VI या श्रेणीतील असतील. यात चालक ओळखपत्र, आपत्कालीन निर्गमन, वाहन प्रवेश, स्टोरेज रॅक यांच्या स्पष्टतेसह आसन रचना, अग्निशमन अलार्म यंत्रणा, वाहन ट्रॅकिंग अशा आधुनिक सुरक्षा तंत्रज्ञानाचा ही समावेश आहे. देशात सुरक्षित विद्यार्थी वाहतूकीसाठी केंद्र सरकारने स्कूल बस नियमावलीचा (ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री स्टँडर्ड्स अर्थात एआयएस-०६३) आधार घेऊन अद्यावत मानके अर्थात स्कूल व्हॅन नियमावली (एआयएस-२०४ ) तयार केली आहे. असेही यावेळी परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले.
कशी असणार स्कूल व्हॅन?
– जीपीएस
– सीसीटीव्ही आणि डॅशबोर्डवर स्क्रीन
– अग्निशमन अलार्म प्रणाली
– दरवाजा उघडा राहिल्यास अलार्म यंत्रणा
– ताशी ४० वेगमर्यादेसह स्पीड गव्हर्नर
– पॅनिक बटण, आपत्कालीन दरवाजे
– स्कूल व्हॅनमध्ये लहान विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी पायरी
– गाडीच्या छतावर शाळेचे नाव





