आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरोधात खेळण्यावरुन वादंग, रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं असेल, उद्धव ठाकरेंचा सवाल

Written by:Smita Gangurde
Published:
Last Updated:
पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं हा शहिदांचा अपमान ठरेल अशी टीका ठाकरेंच्या शिवसेनेनं केलीय. तर भाजपा नेत्यांनी ठाकरे शिवसेनेवर जोरदार पलटवार केलाय.
आशिया कपमध्ये टीम इंडिया पाकिस्तानविरोधात खेळण्यावरुन वादंग, रक्त आणि क्रिकेट एकत्र कसं असेल, उद्धव ठाकरेंचा सवाल

मुंबई– पहलगाम हल्ला, त्यानंतर रद्द करण्यात आलेला सिंधू जलकरार, ऑपरेशन सिंदूर आणि त्यानंतर सातत्यानं भारत आणि पाकिस्तानी नेत्यांमध्ये सुरु असलेले वार-पलटवार. या सगळ्यात आशिया कपमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तानी क्रिकेट टीम एकत्र खेळणार आहेत. याला ठाकरेंच्या शिवसेनेनं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सातत्यानं विरोध केलाय.

आदित्य ठाकरे यांनी पाकिस्तानी टीमला आशिया कपमधून हद्दपार करावे किंवा टीम इंडियाने या सीरिजमध्ये सहभागी होऊ नये, असं पत्र केंद्रीय क्रीडामंत्र्यांना पाठवलं होतं. तर खासदार संजय राऊत यांनीही या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र पाठवलंय. यातच उद्धव ठाकरेंनी या मुद्द्य़ावरुन मोदी सरकारवर सडकून टीका केलीय.

गरम सिंदूरचे कोल्ड्रिंक झाले – उद्धव ठाकरे

ज्या पंतप्रधान मोदींनी रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही, असं सांगितलं, त्याच पंतप्रधानांच्या काळात पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच कशी होऊ शकते असा सवाल उद्अधव ठाकरेंनी उपस्थित केलाय. आपल्या रंगात रक्त नाही तर सिंदूर वाहत असल्याचं मोदी म्हणाले होते, तर आता त्या सिंदूरचं कोल्ड्रिंक झालं का, असा सवालही त्यांनी केलाय. पाकिस्तानशी क्रिकेट खेळणं हा शहिदांचा अपमान ठरेल अशी टीका त्यांनी केलीय.

भाजपाचं ठाकरे शिवसेनेवर टीकास्त्र

ठाकरेंच्या शिवसेनेला अचानक झटका आलाय, अशी टीका भाजपानं केलीय. संजय राऊत यांनी काल दहशतवादी जिवंत आहेत असे विधान केलेय त्याबद्दल त्यांनी माफी मागावी असंही भाजपा नेते म्हणतायेत.
1971 च्या युद्धनंतर भारत पाकिस्तान यांच्यात सामना झाला होता त्यावेळी काँग्रेसची सत्ता होती, त्यावेळी संजय राऊत यांची देशभक्ती कुठे होती, असा सवालही विचारण्यात आलाय. संजय राऊत हे पाकिस्तानचे प्रवक्ते आहेत. खेळ आणि रक्त आम्ही एकत्र आणत नाहीत, संजय राऊत यांना पोटशूळ उठलाय, असं भाजपा प्रवक्ते नवनाथ बन म्हणालेते.

तर संजय राऊत यांनी एवढच सांगाव की पाकिस्तान भारत मॅचमध्ये आपल्या बाजूनं उभ राहणार की पाकिस्तानच्या बाजूनं बुरखा घालून उभं राहणार ? अशी टीका नितेश राणेंनी केलीय.