पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळानं पुणे मेट्रोच्या फेज -२ कामाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पामध्ये लाईन ४ हे खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला या मार्गावरील मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. तर लाईन ४ए मध्ये नळस्टॉप, वारजे ते माणिकबाग मेट्रोचे काम करण्यात येणार आहे.

पुणे मेट्रोचा फेज-२; विस्तार होणार

केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याच्या अंतर्गत मार्गिका क्र. 4 खराडी-हडपसर-स्वारगेट-खडकवासला आणि मार्गिका क्र, 4 ए नळ स्टॉप-वारजे-माणिक बाग मार्गाला मंजुरी दिली. या प्रकल्पातील मार्गिका क्र. 2 ए वनाज ते चांदणी चौक आणि मार्गिका क्र. 2 बी रामवाडी-वाघोली-विठ्ठलवाडी यांना मिळालेल्या मंजुरीनंतर आता प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यांतर्गत मंजूर झालेला हा दुसरा महत्त्वाचा प्रकल्प आहे.

पुणे शहरातील सार्वजनिक वाहतुकीच्या जाळे अधिक विस्तारण्‍यात येणार आहे. 28 उन्नत स्थानकांसह एकूण 31.636 किमी विस्तार असलेल्या या मार्गिका क्र. 4 आणि 4 ए पुण्याच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागांतील माहिती तंत्रज्ञान केंद्रे, व्यावसायिक विभाग, शैक्षणिक संस्था आणि निवासी समूह यांना परस्परांशी जोडतील. हा प्रकल्प येत्या पाच वर्षांत पूर्ण केला जाणार असून त्यासाठी 9,857.85 कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. केंद्र सरकार, महाराष्ट्र राज्य सरकार तसेच बाह्य द्विपक्षीय / बहुपक्षीय वित्तपुरवठा संस्था यांच्यातर्फे हा खर्च उचलला जाईल.

पुण्यातील वाहतूक कोंडीवर उपाय 

मेट्रोच्या लाईन्स पुण्याच्या व्यापक वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनाचा (सीएमपी) एक आवश्यक भाग आहेत. खराडी बायपास आणि नळ स्टॉप (लाईन २) आणि स्वारगेट (लाईन १) येथे कार्यरत आणि मंजूर कॉरिडॉरशी अखंडपणे जोडल्या जाणार आहेत. हडपसर रेल्वे स्टेशनवर एक इंटरचेंजदेखील सुरू करण्यात येणार आहेत. ते लोणी काळभोर आणि सासवड रोडकडे येणाऱ्या कॉरिडॉरशी जोडण्यात येणार आहे. त्यामुळे मेट्रो, रेल्वे आणि बसची सेवा एकत्रित आणि सुलभपणे जोडली जातील, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी दिली. पुण्यातील वाहतूक कोंडीवर मेट्रोचा होणारा विस्तार रामबाण उपाय ठरणार आहे.