मागच्या काही वर्षात राज्यातील वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली आहे. अनेक शहरात नवनवीन रस्ते, उड्डाणपूल आणि रेल्वे मार्ग ( Vande Bharat Express)उभारण्यात येत आहेत. प्रवाशांचा प्रवास सुखाचा, आरामदायी आणि कमी वेळेत पूर्ण व्हावा हाच यामागील मुख्य उद्देश आहे. वाढत्या शहरीकरणामुळे आणि औद्योगिक क्रांतीमुळे महत्त्वाची शहरे एकमेकांना जोडण्यासाठी रेल्वेचा वापरही मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. याच पार्श्वभूमीवर पुणे ते नांदेड अशी नवीन वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन लवकरच प्रवाशांच्या सेवेत येणार आहे.
केंद्राने दाखवला हिरवा झेंडा (Vande Bharat Express)
पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनमुळे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची कनेक्टिव्हिटी जलद होईल. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने या सेमी-हाय-स्पीड ट्रेन प्रकल्पाला हिरवा झेंडा दाखवला असून, त्यासंबंधीची सर्व तयारी अंतिम टप्प्यात आहे. सध्या पुण्यावरून नांदेड ला जायचं म्हटलं तर बस किंवा इतर रस्ते मार्गाने बारा तासांचा कालावधी लागतो. मात्र एकदा का वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन सुरू झाली तर हाच प्रवास अवघ्या सात तासांवर येणार आहे.
कोणकोणत्या स्थानकावर थांबणार
पुणे ते नांदेड वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन (Vande Bharat Express) डिसेंबर 2025 किंवा जानेवारी 2026 पर्यंत प्रवाशांच्या सेवेत येण्याची शक्यता आहे. या वंदे भारत एक्सप्रेसमुळे मराठवाड्यातील नांदेड, लातूर आणि धाराशिव येथील प्रवाशांना मोठा फायदा होईल. कारण ही ट्रेन नांदेड, लातूर, धाराशिव, कुर्डूवाडी, दौंड आणि पुणे या प्रमुख स्थानकांवर थांबेल आहे.आठवड्यातून 5 ते 6 दिवस ती धावेल, अशी शक्यता आहे. या मार्गावरील अंदाजित तिकीट दर एसी चेअर कारसाठी ₹1500 ते ₹1900 दरम्यान असू शकतो. रेल्वे प्रशासन लवकरच या ट्रेनच्या उद्घाटनाची अधिकृत तारीख आणि वेळापत्रक जाहीर करणार आहे.






