Vijay Vadettiwar – निवडणुकी आधी शेतकऱ्यांना आश्वासन द्यायची आणि सत्ता आल्यावर मात्र शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडायचं, ही शेतकऱ्यांची फसवणूक आहे. सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. राज्याचे कृषिमंत्री हे सतत शेतकऱ्यांचा अपमान करताहेत. कृषी खाते म्हणजे ओसाड गावची पाटीलकी आहे. अस कृषिमंत्र्यांना वाटते यावरून ते किती असंवेदनशील आहेत हे स्पष्ट होते.

शेतकऱ्यांचा वारंवार अपमान करणाऱ्या या कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा, आणि त्यांना हवे ते मलईदार खाते द्यावे पण शेतकऱ्यांच्या अपमान करणारे कृषिमंत्री नको, अशी मागणी वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली.

समिती नको, सरसकट कर्जमाफी द्या…

दरम्यान, राज्यात अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना निवडणुकी आधी कोरडवाहू पिकांसाठी १३,५००, बागायतीसाठी २७,००० तर फळबागांसाठी ३६,००० रुपये इतकी मदत आणि ३ हेक्टरपर्यंतची मर्यादा निश्चित होती. आता मात्र कर्जमाफीसाठी समिती नेमण्याची भाषा वापरली जाते. शेतकऱ्यांना समिती नको तर कर्जमाफी करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. बळीराजाच्या विविध प्रश्नावर २९३ च्या प्रस्तावावर बोलताना काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली.

सगळेच बळीराजाचा अपमान करताहेत

सत्ताधारी मंत्री ,आमदार सगळेच बळीराजाचा अपमान करत आहे. आम्ही शेतकऱ्यांना पैसे दिले, मोदींनी सहा हजार रुपये दिली ही उपकाराची भाषा बोलली जाते.एकीकडे सहा हजार रुपये दिले पण खताचे भाव किती वाढले, युरियाचे भाव काय आहेत? रासायनिक खतांची किंमत वाढली, पिकासाठी औषधांची किंमत वाढली म्हणजे एका खिशात टाकले आणि दुसऱ्या खिशाला कात्री लावली त्यात शेतमालाला भाव मिळत नाही. मग शेतकऱ्यांना पैसे दिले ही कसली भाषा आहे? असा सवाल विधिमंडळ नेते वडेट्टीवर यांनी उपस्थित केला.