राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला यावर्षी 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज देशभरात संघ विजयादशमी उत्सव साजरा करत आहे. दरम्यान या दिवशी सरसंघचालक मोहन भागवत काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. संघाच्या नागपूर येथील रेशिमबागेच्या मुख्यालयात संघाचा हा विजयादशमी उत्सव पार पडला. यावेळी मोहन भागवतांना उपस्थितांना संबोधित केले.
नागपुरात संघाचा विजयादशमी उत्सव
यंदाचा विजयादशमीचा उत्सव राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी विशेष आहे. यंदा संघाला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. 1925 मध्ये डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी स्थापन केलेल्या संघटनेला 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. आज सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना काय मार्गदर्शन करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या सोहळ्याला देशाचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद देखील उपस्थित होते.
विजयादशमीच्या उत्सवानिमित नागपूरमध्ये जय्यत तयारी करण्यात आली होती. नागपूरमधील रेशीमबाग हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. याच रेशीमबागेच्या मैदानावर उत्सव साजरा होत आहे. आजपासून संघाचे शताब्दी वर्ष सुरू होणार आहे. 2026 च्या विजयादशमीपर्यंत संघ आपले शताब्दी वर्ष साजरे करणार आहे. या वर्षभरात संघ अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
मोहन भागवत म्हणाले…
या वेळी उपस्थितांना संबोधित करताना संघाचे सर संघचालक मोहन भागवत म्हणाले, “आज स्वर्गीय महात्मा गांधी यांची जयंती देखील आहे. त्यांच्या स्वातंत्र्याच्या लढ्यातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. स्वर्गीय लाल बहादूर शास्त्रीजी यांचे विचार आपल्याला सतत मार्गदर्शक ठरतात. गेल्या काही काळात देशावर अनेक संकटे आली पहलगाम सारख्या हल्ल्यांचा आपण सामना केला. प्रत्युत्तर दिले. त्यामुळे देशाची सेवा आणि राष्ट्रहीत प्रथम असाच आपला विचार असला पाहिजे.”
यावेळी सरसंघचालक मोहन भागवत यांनी अमेरिकेचे टॅरीफ धोरण, स्वदेशी मालाचा वापर अशा अनेक विषयांवर भाष्य केले. अलीकडेच श्रीलंका, नेपाळ, बांग्लादेशमध्ये घडलेल्या घटनांचे उदाहरण देत राज्यकर्त्यांनी लोकांसाठी काम करावे, असा संदेशही यावेळी त्यांनी दिला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शंभरी
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे शताब्दी वर्ष साजरे करत असून यानिमित्ताने संघाकडून अनेक कार्यक्रमाचे आय़ोजन करण्यात आले आहे. भाजप नेत्यांकडून देखील मोठ्या उत्साहाने संघाचे 100 वर्षे पूर्ती साजरी केली जात आहे. दरम्यान, संघ शताब्दीच्या निमित्ताने संघ संस्थापक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी करण्यात आली आहे.






