महाराष्ट्राचे तडफदार आयपीएस अधिकारी आणि तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेले विश्वास नांगरे पाटील यांच्या आईचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. विश्वास नांगरे पाटील यांच्या मातोश्री श्रीमती मंगल नारायण नांगरे पाटील यांचं वृध्दापकाळाने निधन झाले होते. अवघ्या महाराष्ट्रातून याबद्दल शोक व्यक्त केला आहे. तडफदार आयपीएस अधिकारी असण्याबरोबच विश्वास नांगरे – पाटील एक उत्तम लेखल देखील आहेत. त्यांचे ‘मन में है विश्वास’ हे पुस्तक चांगलेच गाजले होते. त्यानंतर सोशल मीडियावर विश्वास नांगरे-पाटील सातत्याने लिहित असतात. मात्र, आता त्यांनी सोशल मीडियावर आपल्या आईला उद्देशून आईच्या शब्दांत लिहिलेली एक पोस्ट चर्चेचा विषय ठरत आहे. नेमकं त्या पोस्टमध्ये काय लिहिलंय ते पाहू….

“मी मंगला नांगरे-पाटील बोलतेय…”

“हो मी मंगल, लोक माझ्या उतारवयात मला विश्वास ची आई म्हणून ओळखत होते. लग्न होईतोवर बाबुरावांची लेक आणि लग्नानंतर पैलवान नारायण आबांची पत्नी म्हणून आयुष्य काढले. माझी स्वतःची अशी काही खास ओळख नव्हती. पण गेल्या संजीवन एकादशीला मला वैकुंठात प्रवेश मिळाला. मला यमदेव न्यायला आले नाहीत तर खुद्द भगवान विष्णूच प्रकट होऊन सोबत घेऊन गेले. माझे नारायण ज्यांचे नाव मी कधीच घेतले नाही ते ७ वर्षांपूर्वी तिथेच वास्तव्याला गेले होते. त्यामुळे गेली सात वर्षे मी पांडुरंगाच्या मागे होते मलाही माझ्या नारायणाकडे घेऊन चल. आणि सरतेशेवटी तो दिवस आलाच. जातेवेळी सगळा गोतावळा सभोवताली जमला होता. मी हळूहळू शांत होत गेले. पहिले हात पाय थंड झाले. नंतर हाताची नस लागायची थांबली. मीटर वर ऑक्सिजन लागायचे बंद झाले. शोभेच्या टाकीतल्या माशासारखा खालचा जबडा आचके देऊ लागला त्यावेळी माझ्या मुलांनी, नातवंडांनी ड्रॉप ड्रॉपने मला गंगाजल पाजले. मी हळूच शांतपणे समाधानाने या पृथ्वीतलावरचा शेवटचा श्वास घेतला…

शेवटचा श्वास मी एकादशीला सोडला होता. पहिला श्वास बार्शीजवळच्या माझ्या खेड्यात ७५ वर्षांपूर्वी घेतला होता. मी माझ्या तीन बहिणी परकर पोलक्यात जुन्या पाटील वाड्यात जिभल्या खेळायचो. माझे पाच भाऊ मी धाकटी असल्याने माझा लाड करायचे. आता माझ्या आधीच माझ्या तीन बहिणी चिमण्यासारख्या उडून लांब दूर निघून गेल्या. मला खूप कुतूहल आहे त्या मला वैकुंठात नक्की भेटतील. आम्ही पुन्हा लहान होऊन झिम्मा फुगडी खेळू. खूप खूप हसू. ते खरं खूर माहेरातलं हसणं मी विसरूनच गेली आहे. माझी आई मात्र १०० वर्ष जगली. माझ्या पाचपैकी चार भाऊ पण निर्वतले. आता आख्ख माहेर मला भेटणार, या भावनेनच मी हरखली आहे, सुखावले आहे.

आत्ता आत्ता माझ्या माहेरी उजनी धरणाचे पाणी आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडे बरे दिवस आले आहेत. मी लहान असताना पाण्याचे दुर्भिक्ष्य त्यामुळे घरी दैना असायची. आठ अपत्यांपैकी दोन भावांचेच शिक्षण वडिलांना परवडणारे होते त्यामुळे माझी चौथीत शाळा सुटली. मला पुस्तक खूप आवडायची. त्यात कविता आणि कथांची ओढ होती. मी आईसोबत बारशाला, डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाला जायचे त्यावेळी मला बायका गाणं गायचा आग्रह करायच्या. माझा आवाज गॉड आहे असं म्हणायच्या. मग मीही सुरात अंगाई गीत, पाळणा गीत गात असे. त्यावेळी माईक वर गाताना माझा सूर अख्ख्या गावात गुंजत असे, त्याच मला खूप अप्रूप होते. मी सोळाची झाली आणि माझ्या लग्नाचे घरात पडघम वाजू लागले. मी जेमतेम १९ वर्षाची झाली असेन, मला सांगली भागातील हे पैलवानाचं स्थळ आलं. माझ्या मावसबहिणीच उपवर मुलाच्या इंजिनिअर असलेल्या भावाशी लग्न झालेलं होत. मला शेतकरी आणि पैलवान असणाऱ्या मुलाशी विवाह करून सांगलीच्या पुढच्या गावात नांदायला जायचे न्हवते. पण माझ्या मताला शून्य किंमत होती. आईला रडून सांगितले पण तिने ऐकून न ऐकल्यासारखे केले. माझे चुलते बारामतीला प्रांत अधिकारी होते. तिथेच पाहण्याचा कार्यक्रम झाला. नवरा मुलगा पैलवान आणि माझ्यापेक्षा १२ वर्षांनी मोठा आहे म्हटल्यावर माझ्या पोटात गोळा आला होता. पण ज्यावेळी मी नजर चोरून यांच्याकडे पाहिले त्यावेळी मी त्यांच्या पिळदार, गोऱ्यापान आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्वाकडे पाहून लट्टू झाले.

माझ्या सासरी म्हणजे कोकरूडला आमचा विवाह धुमधडाक्यात पार पडला. तीन दिवस समारंभ चालले होते. आमची वरात वाजतगाजत रथातून निघाली होती. वेगळ्या संस्कारात आणि वातावरणात माझ्या वैवाहिक जीवनाची सुरुवात झाली. नव्याचे नऊ दिवस संपले. घरात २० माणसे होती. त्यांच्या स्वयंपाकाची जबाबदारी होती. पहाटे लवकर उठून भाकऱ्या थापायला लागायच्या. सासूबाई सर्वांसाठी खूप प्रेमळ होत्या पण मी लांबची असल्याने त्यांच्या मनात माझ्याबद्दल अढी होती. मला हुंडा आणला नाही म्हणून अधून मधून टोमणे ऐकायला लागायचे. त्यांचा हात भलता मोकळा होता. गावातील बलुतेदारांना भरभरून बलुतं द्यायच्या. आमच्याकडे ही पद्धत नव्हती त्यामुळे माझे त्यांच्याशी खटके उडायचे. नंतर मात्र मी त्यांचा वारसा पुढे चालू ठेवला आणि गावातील गणगोतात मिसळू लागले.
मला दिवस गेल्यावर पूर्ण कुटुंबात आनंदाचे वातावरण होते. माझ्या सासूबाई बाळंतपण कोकरूडच्या घरीच करायचं म्हणून मागे लागल्या. माझ्या सगळ्या नणंदाना इथेच मुलगे झाले होते. माझ्या पोटी मुलगाच जन्माला यावा हा अट्टाहास होता. मी मात्र हट्टाने बाळंतपणासाठी माहेरी निघून गेले. माझे पोट मोठे दिसायचे त्यामुळे मुलगाच होईल असे सगळे म्हणायचे. मीही माझं नांदणं सुखाचं व्हावं म्हणून देवाला मुलगा मागत होते. पण पहिली मुलगी झाली. माझ्या सासरहून यांना तर सोडाच कोणीही माझ्या देखण्या गोड लेकीला पाहायला आले नाही. वैतागून मीही तिचे नाव सीमा ठेवले. बस आता सीमा झाली. या पुढे मुलगाच हवा. मी घुसमटत होते पण बोलू शकत नव्हते. दुसऱ्या वेळी मी पोटुशी असताना मला जर मुलगी झाली तर सवतीसोबत राहावं लागेल असं धमकावण्यात आलं. मी निनाईला नांदायचा विश्वास मागितला आणि मला विश्वास झाला. नंतर विकास झाला. माझे बरे दिवस आले होते. पण आमच्या सासुबाईंचा आजारपणात पंढरीला वारीला जाण्यावरून ह्यांच्याशी वाद झाला. तू गेलीस तर मी तुला आई म्हणून हाक मारणार नाही असा दम ह्यांनी सासूबाईंना भरला आणि खराही केला.
आईशी अबोला धरला. आईशी बोलत नाही मग बायकोशी कस बोलायचं, लोक काय म्हणतील म्हणून माझ्याशीही बोलणं बंद केलं. माझ्या आयुष्यातले कोमल क्षण संपले , माझ्या वैवाहिक जीवनातला ओलावा आटला. उपासतापास केले. ज्योतिबाला जाऊन नवस केले. देवऋश्याना दानधर्म केले. पण यांचे हृदय पाघळले नाही. मोठा गोतावळा होता पण मी एकटी पडले. सोन्यासारखी तीन पोर होती त्यांच्यासाठी जगायची पदरी खूणगाठ बांधली. कधीकधी त्रागा व्हायचा, संताप यायचा त्यावेळी मुलांना रट्टे पडायचे. मी माझ्या द्वंद्वात सापडल्याने मुलांची होरपळ व्हायची. पण यांनी मुलांच्या शिक्षणाची आबाळ होऊ दिली नाही. विश्वास शिराळ्याला शाळेला गेला आणि अभ्यासात चमकू लागला.
आमचे हे तोवर गावचे सरपंच आणि नंतर पंचायत समितीचे सभापती झाले. घरात लोकांची वर्दळ वाढली. सासूबाई निर्वतल्या त्यामुळे सगळी जबाबदारी माझ्यावर पडू लागली. हळूहळू मी माहेर विसरू लागले आणि वारणेच्या मातीत माझी पाळेमुळे घट्ट झाली. मुले मोठी होऊ लागली. फौजदार जावई मिळाले. मुलगा आयपीएस झाला. दुसरा मुलगा वडिलांचा राजकारण आणि शेतीबाडीचा वारसा चालवू लागला. म्हातारपण आणि आजारपण आम्हा दोघा उभयतांना घेरू लागलं. दोन्ही सुना आम्हा दोघांची लेकीसारखी काळजी घेत होत्या. ह्यांच आजारपण सांभाळताना मीही आजारी पडू लागले. मुलांनी सगळे उपचार केले पण हृदयाची, मणक्याची, मेंदूची आणि खुब्याची सर्जरी करून यांना काही स्वास्थ्य लाभले नाही. ते गेले आमचा अबोला आणि अबोल नातेही संपले. पण त्या अबोल्यातही ऊब होती. त्यात अनामिक ओढ होती. जी त्यांच्या जाण्याने रिती झाली. सगळं असून काहीच नसल्यासारखं वाटायचं. खोकला कमी होत नव्हता. मुलगा दरवेळी मुंबईला उपचार करण्यासाठी मागे लागायचा. पण हा त्याच्या वडिलांसारखे मला पण ऑपरेशन टेबल वर घेऊन जाईल याची भीती वाटायची. शेवटी वेदना सहन होत नाहीत तर विठूनामाचा ध्यास धरला. त्याला घेऊन जाण्यासाठी साकडं घाटल.
शेवटी त्यानं माझं ऐकलं आणि स्वतः पांडुरंग एकादशीला मला न्यायला आला. माझ्या बेड च्या शेजारी सगळे सोयरे उभे होते.डॉ पाटलांनी नस धरून ठेवली होती. तेवढ्यात शुभ्र रेशमी पितांबर परिधान केलेले विष्णू भगवान हळूच बेड जवळ आले आणि चला मंगला बाई, माहेरी जायची वेळ झाली. लेक उसासे घेऊन रडत होती. दोन्ही लेकांनी अश्रू ढाळत माझे दोन्ही हात हातात धरले होते. तसे माझे त्राण संपले होते. पण विष्णू भगवान दिसताच मी जड अंतःकरणाने माझ्या लेकाच्या हातातून हात सोडवून भगवंताच्या हाती दिला. लगबगीने उठून बसले आणि सगळ्या लेकरांना भरभरून आशीर्वाद दिला. माझ्या वास्तूचे आभार मानले आणि भगवंताच्या मागून लगबगीने चालू लागले. तेवढ्यात लेकीने हंबरडा फोडला. मुलं हमसून हमसून रडू लागली. क्षणभर मागे वळून पाहावंसं वाटलं. पण विठ्ठलाच्या सानिध्यात अनंतात विलीन होण्याच्या उत्कटतेणे पलटू दिले नाही. जगणं संपलं, भोग संपले आणि त्या ८४ लक्क्ष जन्मांच्या फेऱ्यातून मुक्तता झाली. मी वैकुंठी विलीन जाहले.”

विश्वास नांगरे-पाटलांची पोस्ट चर्चेत

एकूणच आपल्या लेखणीमुळे आणि पोलीस अधिकारी म्हणून कामाची छाप पाडलेल्या विश्वास नांगरे-पाटलांची ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. खरंतर संसाराचा गाडा हाकताना आपल्या आईने कधीही व्यक्त न केलेल्या भावनांना आईच्याच शब्दांत नांगरे-पाटलांनी वाट मोकळी करून दिली आहे. त्यामुळे ही पोस्ट सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.