जानेवारी महिन्यात साताऱ्यामध्ये अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार आहे. यासाठी अध्यक्षांच्या नावावर आता शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांच्या नावाची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या शर्यतीत ‘पानिपत’कार विश्वास पाटील ‘कोसला’कार भालचंद्र नेमाडे, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठीच्या समितीचे अध्यक्ष रंगनाथ पठारे यांच्याही नावाची चर्चा होती.
‘पानिपत’कार विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब
अध्यक्ष निवडण्यासाठी पुण्यातील साहित्य परिषदेत आज सकाळी अकरा वाजता बैठक आयोजित करण्यात आली होती. साहित्य महामंडळाच्या वेगवेगळ्या शाखांकडून वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. ज्यामध्ये रंगनाथ पठारे, विश्वास पाटील , बाळ फोंडके यांची नावे आघाडीवर होती. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलींद जोशी यांनी काही दिवसांपुर्वी भालचंद्र नेमाडे यांची देखील भेट घेऊन त्यांना अध्यक्षपदासाठी गळ घातली होती. मात्र नेमाडेंकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर पानिपतकार विश्वास पाटलांचीच अध्यक्ष म्हणून वर्णी लागेल, अशी जोरदार चर्चा सुरू होती. त्यानंतर आता पुन्हा विश्वास पाटलांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
विश्वास पाटील नेमके कोण? साहित्य क्षेत्रात काय योगदान?
विश्वास पाटील हे मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध व लोकप्रिय कादंबरीकार आहेत. त्यांनी ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय विषयांवर आधारित अनेक प्रभावी कादंबऱ्या लिहिल्या आहेत. ‘पानिपत’ ही त्यांची सर्वाधिक गाजलेली ऐतिहासिक कादंबरी असून तिच्यातून त्यांनी आपल्या संपादकीय शैलीची एक आगळीवेगळी छाप मराठी वाचकांवर टाकली आहे. त्यांची भाषा प्रवाही, समृद्ध आणि वाचकांच्या भावनांना स्पर्श करणारी आहे. युद्ध प्रसंग, राजकीय चढाओढी, आणि वैयक्तिक संघर्ष हे सारे प्रसंग ते अशा शैलीत मांडतात की वाचक त्या काळात डोकावतोय असा भास होतो. त्यामुळे विश्वास पाटील यांच्यासारख्या प्रभावी साहित्यिकाला या ठिकाणी अध्यक्ष म्हणून संधी मिळाल्याने निर्णयाचे कौतुक होताना दिसत आहे.






