शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांना महाराष्ट्राच्या राजकारणात विशेष महत्व आहे. या निवडणुका विधानपरिषदेसाठी घेतल्या जातात आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित प्रश्न मांडण्याची मोठी संधी यामधून मिळते. शिक्षक मतदारसंघातून शिक्षक प्रतिनिधी निवडले जातात, तर पदवीधर मतदारसंघातून उच्चशिक्षित वर्गाचे प्रतिनिधी निवडले जातात. या निवडणुकांमधून समाजातील सुशिक्षित आणि जाणकार व्यक्तींना विधानप्रक्रियेत सहभागाची संधी मिळते. त्यामुळे शिक्षण, रोजगार, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शिक्षणव्यवस्थेतील सुधारणा यांवर थेट प्रभाव पडतो. महाराष्ट्रातील या निवडणुका साधारण वर्ष ते दीड वर्षांच्या कालावधीवर येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे मतदारांची नाव नोंदणी सुरू करण्यात आली आहे.

शिक्षक-पदवीधर निवडणुकीची मतदार नोंदणी

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे आणि अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर, 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 आणि 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर, 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच 6 नोव्हेंबर नंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 आणि 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल. 10 डिसेंबर, 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर, 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

ऑनलाईन मतदार नोंदणीची प्रक्रिया कशी?

शिक्षक आणि पदवीधर मतदार संघांसाठी ऑनलाईन नोंदणीची सुविधा देखील उपलब्ध आहे. इच्छुकांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या वेबसाईटवर जाऊन अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
मतदार नोंदणीसाठी आवश्यक पात्रता निकष, आवश्यक कागदपत्रे व संबंधित माहिती या वेबसाईटवरील ‘Manual’ या विभागात पाहता येईल. त्यामुळे अद्याप अर्ज सादर न केलेल्या पात्र पदवीधर आणि शिक्षकांनी तात्काळ आपली नोंदणी करून घ्यावी, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

पुणे पदवीधरवरून भाजप-राष्ट्रवादी संघर्ष

पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक आणखी दीड वर्ष लांब आहे. पण महायुतीत आतापासूनच कुरघोडीचं राजकारण सुरू झालं आहे. महायुतीतील ज्येष्ठ नेते आणि राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पदवीधर मतदार संघातून शरद लाड यांची उमेदवारी जाहीर केली. पण याच मतदारसंघातून प्रताप उर्फ भैय्या माने यांच्यासाठी आग्रही असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी इतक्या लवकर उमेदवारी घोषित करण्याचं कारण काय? असा सवाल उपस्थित केला आहे. यामुळे महायुतीतील दोन्ही मंत्र्यांमध्ये राजकीय वैर निर्माण झाल्याची चर्चा रंगली आहे.