मुंबई – चुरशीच्या ठरलेल्या महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचा धुरळा मंगळवारी संध्या काळी शांत झाला.त्यानंतर आता घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्याचा प्रयत्न उमेदवारांमार्फत होतो आहे. उद्या मतदान असून यासाठी राज्यात सर्व ठिकाणी मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
वोट चोरी आणि दुबार मतदारांवरुन आरोप करणाऱ्या ठाकरे युतीनं दुबार मतदारांना सोडणार नाही, अशा इशारा दिला आहे. दुबार मतदारांना दिसेल तिथं बदडून काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे उद्याच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी राडे होण्याची शक्यता आहे.
ठाकरेंची भगवा ब्रिगेड मैदानात
दुबार मतदारांना धडा शिकवण्यासाठी ठाकरे युतीच्या वतीनं 2000 कार्यकर्त्यांची फौज निर्माण केली आहे. प्रत्येक मतदार केंद्राबाहेर हे भगवा ब्रिगेडचे कार्यकर्ते तैनात असतील. जर दुबार मतदाराची तक्रार आली तर अशा व्यक्तीला थेट चोप देण्यात येणार आहे.
मुंबईत किती दुबार मतदार
मुंबईत 1 लाख 68 हजार 350 दुबार मतदार सापडले आहेत. त्यापैकी 48 हजार जणांनी एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचं हमीपत्र लिहून दिलंय. उरलेल्या 1 लाख 20 हजार दुबार मतदारांचं काय होणार, हा प्रश्न अनिश्चित आहे. त्यामुळे हे मतदार दिसले तर त्यांना सोडणार नाही असा इशारा ठाकरेंकडून देण्यात आलाय.
मुंबई महापालिका निवडणूक चुरशीची असल्यानं प्रत्येक मतदारसंघात विजयाचं मार्जिन हे काही शे मतांचं असण्याची शक्यता आहे. अशात दुबार मतदार हा खेळ पालटवू शकतात. त्यांुळेच कोणताही धोका पत्करायचा नाही अशी भूमिका ठाकरे युतीनं घेतलेली दिसतेय.
मतांसाठी भगव्याची आठवण, भाजपचं टीकास्त्र
ठाकरे युतीनं केलेल्या या भगव्या ब्रिगेडच्या घोषणेवर भाजपनं टीका केलीय. मुस्लीम मतांसाठी कायम राजकारण करणाऱ्यांना आता मतदानाच्या तोंडावर भगव्याची आठवण झाली आहे, अशी टीका मंत्री आणि मुंबईतील भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी केलीय.
मुंबईत अस्तित्वाची लढाई
मुंबई महापालिका निवडणुकीकडे सगळ्या देशाचं लक्ष आहे. 25 वर्षांपासून सत्तेत असलेल्या ठाकरे सेनेच्या विरोधात भाजप आणि शिंदे शिवसेना एकत्र आलेल्या आहेत. तर हे आव्हान रोखण्यासाठी ठाकरे बंधू 20 वर्षांनी एकत्र आलेले आहेत.
प्रचारातही एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप, फैरी झाडण्यात आल्यात. मराठी अस्मिता, अदानी यासारखे मुद्दे प्रामुख्यानं मांडण्यात आलेत. तर ठाकरेंच्या अस्तित्वाची लढाई म्हणून याकडे पाहण्यात येतंय. मुंबई महापालिका निवडणुकीत काय होणार, याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे.





