भिवंडी, ठाण्याच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत; दुरूस्तीच्या कामांमुळे नागरिकांना मनस्ताप

Written by:Rohit Shinde
Published:
जुनी भिवंडी आणि ठाणे शहरातील काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांना मात्र काहीसा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अधिक जाणून घेऊ...
भिवंडी, ठाण्याच्या काही भागात पाणीपुरवठा विस्कळीत;  दुरूस्तीच्या कामांमुळे नागरिकांना मनस्ताप

भिवंडी आणि ठाणे शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा चांगलाच विस्कळीत झाला आहे. जुन्या भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन बदलण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे शनिवारी जुन्या भिवंडी भागातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 दिवस कमी दाबाने पाणी येणार आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. ठाण्याच्या काही भागात देखील सध्या कमी दाबाने पाणीपुरवठा होताना दिसत आहे.

जुन्या भिवंडीत पाणीपुरवठा बंद

मानसरोवर परिसरातून जुन्या भिवंडी शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाइपलाइन बदलण्याचे काम करण्यात येणार असून, या कारणास्तव शनिवार, 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजल्यापासून रविवार, 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत म्हणजे एकूण 24 तास पाणीपुरवठा बंद राहील. या कालावधीनंतर पुढील 1 दिवस कमी दाबाने आणि मर्यादित प्रमाणात पाणीपुरवठा केला जाईल, अशी माहिती भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता संदीप पटणावर यांनी दिली.

या भागांत पाणीपुरवठा विस्कळीत

पद्मानगर, गायत्रीनगर, रामनगर, नवजीवन कॉलनी, बीएनएन कॉलेज रोड, पटेल कंपाऊंड गल्ली नं. 1, 2, 3, भैयासाहेब आंबेडकरनगर, न्युप्रकाशनगर, माधवनगर, सोमानगर, विठ्ठलनगर, गंगारामवाडी, लकडाचाळ, न्यू टावरे कंपाऊंड, दुधबावडी, हाफिजनगर, आलमगीर व्हिडिओ परिसर, न्यू इस्लामाबाद, आझमीनगर, खालीक शेठ चाळ, दिवानशाह, हांडीकंपाऊंड, समरुबाग, इदगाह रोड, कारीवली रोड, दर्गारोड, मोमिनबाग, कोतवालशाह, मुर्तुजा कंपाऊंड, धोबीतलाव, बाबु चुनिवाला बिल्डिंग, टावरेवाडी, चारचाळी, हमालवाडा, तंडेल मोहल्ला, बंदर मोहल्ला, सौदार मोहल्ला, मुकरी शाह, सुतारआळी, भोईवाडा, भुसार मोहल्ला, ब्राह्मणआळी, कासारआळी, पोस्ट ऑफिस परिसर, बाजारपेठ, हफसन आळी, जैतुनपूरा, कापतलाव, समदशेठ बगीचा,

बंगालपूरा, धोबी मोहल्ला, सोनापूर, तेली मोहल्ला, कॅसरबाग, ठाणारोड, बोबडे मोहल्ला, गौरीपाडा, भुसार मोहल्ला, खजुरपूरा, नाचन कंपाऊंड, समदनगर, कणेरी, पायल टॉकीज परिसर, अजंठा कंपाऊंड 1 व 2, धामनकर नाका, वॉटर सप्लाय कॉलनी, ठाणगेआळी, तीनबत्ती, फैजान कंपाऊंड, मेहता कंपाऊंड, रोशनबाग, देऊनगर टावरे कंपाऊंड, निजामपूरा, विठ्ठलनगर (चिंचेच्या झाडाजवळ), ग्लोबल कॉम्प्लेक्स आणि खालीक शेठ कंपाऊंड रोशनबाग.

ठाणे शहरात अनियमित पाणीपुरवठा

ठाणे शहराच्या काही भागात अनियमित पाणीपुरवठा गेल्या काही दिवसांपासून होताना दिसत आहे. शहरातील दिवा, मुंब्रा, कळवा आणि वागळे इस्टेट मधील काही भागांचा पाणीपुरवठा थांबणार आहे. या बंदीमुळे पुढील 1 ते 2 दिवस शहरात पाणी कमी दाबाने पुरवठा होईल, ज्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे भिवंडी असो वा ठाणे भागातील नागरिकांना गरजेपुरता पाणीसाठा करून ठेवा, असे आवाहन पालिकांकडून करण्यात येत आहे.