पुणेकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे. शहरातील नागरिकांना गुरुवारी म्हणजेच आज आणि उद्या पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येत असल्याने शहरातील काही प्रमुख भागांचा पाणीपुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देखभाल व दुरुस्तीच्या कामांमुळे अनेक शहरांमध्ये वारंवार पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. अचानक होणाऱ्या पाणी कपातीमुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन पूर्णपणे विस्कळीत होते. पिण्याचे पाणी साठवणे, घरगुती कामे, स्वच्छता आणि व्यवसाय यावर याचा मोठा परिणाम होत आहे. अनेकदा पूर्वसूचना न मिळाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होते.
आज आणि उद्या पाणीपुरवठा विस्कळीत
यामुळे गुरुवारी 18 डिसेंबर रोजी संबंधित परिसरात पूर्ण दिवस पाणी मिळणार नाही. यापार्श्वभूमीवर पाण्याचा आवश्यक साठा करून ठेवण्याचा आणि पाणी काटकसरीने वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत ही कामे केली जाणार असून पाणीपुरवठा व्यवस्थेतील महत्त्वाच्या स्थापत्य घटकांची तातडीने दुरुस्ती करणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या माहितीनुसार, या कामांमुळे गुरुवारी संपूर्ण दिवस पाणीपुरवठा बंद राहील, तर शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी पाणीपुरवठा उशिरा आणि कमी दाबाने सुरू होण्याची शक्यता आहे.





