Remedies to remove kidney stones: बदलेल्या लाईफस्टाईलमुळे लोकांच्या कामाच्या पद्धतीही बदलल्या आहेत. सतत खुर्चीवर बसून काम केल्याने शारीरिक हालचाली मंदावल्या आहेत. त्यामुळे विविध आरोग्य समस्या उद्भवत आहेत. त्यातीलच एक समस्या म्हणजे किडनी स्टोन होय. फक्त बसून काम केल्याने किडनी स्टोन होत नाही. तर काही इतर सवयीसुद्धा त्याला जबाबदार असतात.
किडनी स्टोन असल्यास पोटाच्या एका बाजूला प्रचंड वेदना होतात. अनेक लोक त्यावर शस्त्रक्रिया करून घेतात. परंतु तुमच्या लाईफस्टाईलमध्ये काही चांगले बदल करून तुम्ही किडनी स्टोनपासून आराम मिळवू शकता. परंतु तुमचा किडनी स्टोन किती मोठा किंवा लहान आहे त्याची डॉक्टरांकडून तपासणी करून त्यांच्या सल्ल्याने हे उपाय केल्यास जास्त चांगले ठरते. चला पाहूया सोपे उपाय…..
पाणी सर्वात चांगले औषध-
तज्ज्ञांच्या मते किडनी स्टोन अर्थातच मुतखड्यावर पाणी हे सर्वात फायदेशीर औषध आहे. किडनी स्टोन असणाऱ्यांनी दिवसातून ३ ते ४ लिटर पाणी पिणे आवश्यक आहे.पाणी विषारी घटक शरीरातून बाहेर करते. त्यामुळे किडनी स्टोन मोठा होण्यापासून रोखते. शिवाय नवीन खडे तयार होऊ देत नाही.
आहारावर लक्ष द्या-
किडनी स्टोन असल्यास काही पदार्थ आहारातून बाहेर करणे चांगले असते. किडनी स्टोनमध्ये पालक, शेंगदाणे, टोमॅटो, चॉकलेट आणि जास्त मीठ असणारे पदार्थ खाणे टाळा. अशाने समस्या आणखी वाढू शकते. त्याऐवजी आहारात हंगामी फळे, पालेभाज्या, आणि डाळींचा समावेश करा.
व्यायाम आणि योगा-
किडनी स्टोन फक्त आहार आणि पाणी पिल्याने दूर नाही होत. त्यासाठी व्यायामसुद्धा आवश्यक आहे. जास्तवेळ एका ठिकाणी बसून किंवा ताणतणावामुळेसुद्धा किडनी स्टोनची समस्या वाढू शकते. त्यामुळे दररोज सकाळी व्यायाम, प्राणायाम करा. शिवाय थोडा वेळ चालण्याचा व्यायाम करा. असे केल्याने किडनी स्टोनपासून आराम मिळण्यास मदत होईल.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)





