MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासाठी थंडीच्या लाटेचा इशारा ; तापमान 10°C खाली जाण्याची शक्यता

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातील तापमान 10 अंशाच्या खाली घसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही दिवस राज्यात नागरिकांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.
Maharashtra Weather Update: महाराष्ट्रासाठी थंडीच्या लाटेचा इशारा ; तापमान 10°C खाली जाण्याची शक्यता

महाराष्ट्रात तापमानाचा पारा चांगलाच घसरला असून काही ठिकाणी थंडीची लाट असल्याचे चित्र आहे. राज्यात थंडीचा कडाका कायम असून बहुतांश भागात हुडहुडी भरत असल्याचे चित्र आहे. पुढील काही दिवस थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोरडे हवामान, कडाक्याची थंडी आणि धुके असे हवामानाचे चित्र राहण्याची शक्यता आहे. 20 डिसेंबर रोजी राज्यातील हवामान नेमके कसे राहिल? ते अधिक सविस्तर जाणून घेऊ…

महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पडणार !

महाराष्ट्रात थंडीने जोर धरला आहे. पहाटेच्या वेळी वाढलेला गारठा आणि रात्रीचा बोचरा वारा नागरिकांना जाणवू लागला असून राज्यासाठी पुढील काही दिवस आव्हानात्मक ठरण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने शनिवारी 20 डिसेंबर रोजी राज्यातील अनेक भागांमध्ये थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी किमान तापमान 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील किमान तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्हे सर्वाधिक थंड ठरत असून जेऊर येथे 5 अंश सेल्सिअस इतके नीचांकी तापमान नोंदवले गेले आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ही थंडी पुढील काही दिवस कायम राहणार असून नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.शनिवारी पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक भागांत किमान तापमान 10 अंशांच्या खाली जाण्याची शक्यता आहे. पहाटे आणि रात्रीच्या वेळेत गारठा अधिक जाणवू शकतो. लहान मुले, वृद्ध आणि आजारी व्यक्तींनी या काळात उबदार कपड्यांचा वापर करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

राज्यात हवामानात मोठे बदल होणार!

दरम्यान, हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 48 तासांत कमाल तापमानात पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोणतेही मोठे बदल जाणवणार नाहीत. तर किमान तापमानात देखील पुढील 7 दिवस सध्याचीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. शुक्रवारी 19 डिसेंबर रोजी निफाड येथे 5.4 अंश सेल्सिअस, धुळे येथे 5.6 अंश सेल्सिअस, जेऊर येथे 5.5 अंश सेल्सिअस, तर परभणी (कृषी विद्यापीठ) येथे 6.0 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तसेच अहिल्यानगर, जळगाव, मालेगाव, नाशिक आणि गोंदिया येथे 8 अंशांच्या खाली, पुणे आणि नागपूर येथे 9 अंशांच्या खाली तापमान नोंदले गेले.