MP Breaking News
Sun, Dec 21, 2025

Sharad Pawar On Shalinitai Patil Death : शालिनीताईंच्या निधनानंतर पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, जितक्या जाहीरपणे माझ्यावर टीका….

Published:
जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने "शरदचं नेतृत्व मान्य करा." हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत असे शरद पवारांनी म्हटले
Sharad Pawar On Shalinitai Patil Death : शालिनीताईंच्या निधनानंतर पवारांची पोस्ट चर्चेत; म्हणाले, जितक्या जाहीरपणे माझ्यावर टीका….

Sharad Pawar On Shalinitai Patil Death : माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या पत्नी आणि राज्याच्या माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ९४ व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शालिनीताई पाटील या त्यांच्या स्पष्ट वक्तेपणा स्वभावासाठी ओळखल्या जायच्या. आज त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळातून अनेक मान्यवरांनी दुःख व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सुद्धा सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत शालिनीताई पाटील यांच्या बद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

काय म्हणाले शरद पवार (Sharad Pawar On Shalinitai Patil Death)

शरद पवार यांनी म्हटलं, राज्याच्या माजी कॅबिनेट मंत्री, माजी खासदार बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांच्या निधनाचं वृत्त दुःखद आहे. त्या आपली मतं मांडताना कधीही कचरत नसत. जितक्या जाहीरपणे त्या माझ्यावर टीका करत तितक्याच खुलेपणाने “शरदचं नेतृत्व मान्य करा.” हा वसंतदादांचा संदेश शालिनीताई निसंकोचपणे सहकाऱ्यांपर्यंत पोहचवत. एक स्पष्टवक्त्या, कायद्याच्या अभ्यासक, माजी मंत्री अशा बॅरिस्टर शालिनीताई पाटील ह्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.

कोण होत्या शालिनीताई पाटील??

शालिनीताई पाटील ह्या माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्या दुसऱ्या पत्नी होत्या. वसंतदादा पाटील यांच्या पत्नी असल्या तरी त्यांनी शालिनीताईंनी महाराष्ट्राच्या राजकारणात स्वतःची एक वेगळी आणि आक्रमक अशी ओळख निर्माण केली होती. शालिनीताई पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते, तसेच कोरेगाव विधानसभा मतदारसंघातून 1999 ते 2009 या काळात त्या आमदार म्हणून निवडून आल्या होत्या. त्यापूर्वी 1980 च्या दशकात त्यांनी काँग्रेस सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवले होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून पहिल्यांदा आवाज उठवणाऱ्या नेत्या म्हणून शालिनीताईंना ओळखले जात होते. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी एकेकाळी काॅग्रेस ची महाराष्ट्राची धूरा ताईंवर सोपवली होती स्व.यशवंतराव चव्हाणही ताईंना आदराने मान द्यायचे