हल्ल्याचे उत्तर जशाच तसे देऊ, आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्यानंतर महायुतीच्या ‘या’ नेत्याचा इशारा

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
संगमनेर शहरात आमदार अमोल खताळ यांच्याबाबतीत घडलेली घटना अत्यंत चुकीची आहे. या घटनेचा काँग्रेसच्या वतीनं निषेध करत आहोत. पोलिसांनी निष्पक्षपणानं या घटनेची चौकशी करावी.
हल्ल्याचे उत्तर जशाच तसे देऊ, आमदार अमोल खताळ यांच्यावरील हल्ल्यानंतर महायुतीच्या ‘या’ नेत्याचा इशारा

AMOL KHATAL – अहिल्यानगरमधील संगमनेर तालुक्यातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. शिवसेना शिंदे गटाचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरुवारी रात्री एका तरुणानं हल्ला केला. हात मिळवण्याच्या बहाण्यानं झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात काहीकाळ तणाव निर्माण झाला. संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे राजस्थान युवक मित्र मंडळाच्या वतीनं आयोजित संगमनेर फेस्टिव्हलच्या उद्घाटनावेळी ही घटना घडली. सुरक्षारक्षकांनी तत्काळ धाव घेत हल्लेखोराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांकडून तपास सुरु

दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर या हल्ल्यामुळे संगमनेरातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच आमदार अमोल खताळ यांच्यावर हल्ला झाल्याचं समजताच मालपाणी लॉन्सच्या बाहेर खताळ समर्थक मोठ्या संख्येनं जमले. त्यामुळे पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी शहरात बंदोबस्त वाढवला आहे. संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ या तरुणानं अचानक आमदार खताळ यांच्यावर झडप घालत हल्ला केला. मात्र, घटनास्थळी उपस्थित असलेल्या पोलिसांनी त्याला तात्काळ पकडत ताब्यात घेतलं.

महायुती त्याच भाषेत उत्तर देतील

काही लोकांना लोकशाही मान्य नसेल आणि ठोकशाही मान्य असेल तर महायुतीचे कार्यकर्ते त्याच भाषेत उत्तर देतील, असा विखे पाटील यांनी इशारा दिला. भ्याड हल्ला करून महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास कमी होईल, असा काहींचा गैरसमज असेल तर हा गैरसमज दूर करायला वेळ लागणार नाही, असेही विखे पाटील यांनी सूचक वक्तव्य केलं आहे. घटनेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध केला. हा भ्याड हल्ला असल्याचे सांगत त्यांनी दोषींवर तात्काळ कारवाईचे आदेश दिले आहेत.