Weather Update : महाराष्ट्रात हिवाळ्याची थंडी हळूहळू कमी होत असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र, ऋतूबदलाच्या या टप्प्यावर राज्यात आज आणि उद्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पुढील काही दिवस थंडीचे प्रमाण कमीच राहण्याची शक्यता आहे.
काही जिल्ह्यांना यलो अलर्ट Weather Update
मागील दोन आठवड्यांपासून राज्यातील अनेक भागांत ढगाळ हवामान पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पावसाला पोषक वातावरण तयार झाले असून किमान तापमानातही हळूहळू वाढ होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, सोमवार (२ फेब्रुवारी) रोजी कोकण आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासाठी काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. Weather Update
हे ही वाचा
विदर्भ- मराठवाड्यातही पाऊस पडणार =
दरम्यान, नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज सोमवार आणि उद्या मंगळवार या दोन दिवसांत पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीमसह काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडू शकतो. सध्या विदर्भातील अनेक भागांत ढगाळ वातावरण असून, उत्तरेकडून पश्चिम दिशेने जाणाऱ्या पश्चिमी झंझावातामुळे हे हवामान तयार झाले आहे.
मराठवाड्यातही पावसाची शक्यता असून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे. याउलट, पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे शहरात सकाळच्या वेळेस थंडीचा कडाका जाणवत असून, त्यानंतर दिवसभर आकाश प्रामुख्याने स्वच्छ राहील. येथे कमाल तापमान सुमारे ३० अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.