Maharashtra Rain : राज्यात विदर्भ वगळता राज्यातील अनेक भागात गेल्या २४ मुसळधार पावासाची नोंद झाली आहे. राज्यात गेल्या २४ तासांमध्ये मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे. तर ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी, मुंबई शहर ६२.९ मिमी, रायगड ५४.१ मिमी आणि पालघर जिल्ह्यात ४९.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

सर्वांधिक पाऊस कुठे पडला?

  • मुंबई उपनगर जिल्ह्यात ८३.४ मिमी पाऊस झाला आहे.
  • ठाणे जिल्ह्यात ७३.७ मिमी
  • मुंबई शहर ६२.९ मिमी
  • रायगड ५४.१ मिमी
  • पालघर जिल्ह्यात ९.७ मिमी सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

२४ तासात तिघांचा मृत्यू…

दुसरीकडे मुंबई उपनगर जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्ती आणि मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर यवतमाळ जिल्ह्यात पाण्यात बुडून एक व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. धुळे जिल्ह्यात भिंत पडून चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे, तसेच झाड पडून तीन व्यक्ती जखमी, स्लॅब पडून दोन व्यक्ती जखमी आणि भिंत पडून दोन व्यक्ती जखमी झाल्या आहेत. तसेच अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.

मुंबई- गोवा महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा

सातारा जिल्ह्यातील पाटण- चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर वाहतूकीसाठी केलेला पर्यायी रस्ता पाण्याखाली जाऊन खचल्याने वाहतूक बंद करण्यात आली आहे. दुचाकी व चार चाकी वाहतूक नेरळे- माणगाव- मणेरी- चाफेर-संगमनगर धक्का मार्गे कोयनानगर अशी वळवण्यात आली आहे. तर रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी इशारा पातळीवर आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांना सतर्क राहाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रत्नागिरी येथे मुंबई- गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील वळंजवडी येथे महामार्गावर १०० मीटर परिसरात भेगा पडल्याने या महामार्गावरील वाहतूक एकेरी मार्गावरून सुरू आहे.