Who will be the Mayor of Mumbai? : मुंबईत महापौरपदी कोण बसणार, याची जोरदार चर्चा सध्या सुरु आहे. शिंदे शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँड्सएन्ड हॉटेलमध्ये ठेवल्यानंतर महापौरपदाचा सस्पेन्स अधिक वाढलाय. ठाकरे-शिंदेंकडून नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा करण्यात येतोय, तर ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी उपस्थित नसतील असंही सांगण्यात येतंय. काय आहेत महापौरपदाच्या पाच शक्यता जाणून घेऊयात
मुंबई महापालिकेत बहुमत मिळाल्यानंतर भाजप आणि शिंदे शिवसेनेकडून असा विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. मात्र त्यानंतर काही तासातच शिंदेंच्या शिवसेनेच्या नगरसेवकांना ताज लँड्सअँड हॉटेलमध्ये नेण्यात आलं आणि हॉटेल पॉलिटिक्सची सुरुवात झाली. त्यातच उद्धव ठाकरेंनी महापौरपदाबाबत देवाच्या इच्छेचं विधान केलं आणि त्यानंतर महापौर कुणाचा ही चर्चा रंगली. शिंदेंचं नगरसेवक संपर्कात असल्याचा दावा ठाकरे शिवसेनेकडून करण्यात आला. पडद्याआड हालचाली सुरू असल्याचं सांगण्यात आलं. नगरसेवक ठेवण्यात आलेल्या हॉटेलमधल्या युनियममार्फत नगरसेवकांवर ठाकरेंची नजर तर नाही ना? अशी चर्चा त्यामुळे सुरू झाली.
एकनाथ शिंदेकडून इशारा…
दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेनं ठाकरेंनाच सबुरीचा सल्ला दिलाय. ठाकरेंनी त्यांच्या नगरसेवकांकडे लक्ष द्यावं, महायुतीचा महापौर होईल तेव्हा कोण नॉटरिचेबल असेल ते पाहा, असा इशारा शिंदेंकडून देण्यात आला आहे. शिंदे आणि ठाकरेंमध्ये हा वाद सुरू असतानाच युतीतही सारं काही आलबेल नसल्याचं समोर आलं. मुंबईत सर्वात जास्त नगरसेवक भाजपचे निवडून आलेले असतानाही, शिंदेंच्या शिवसेनेकडून महापौरपदाची मागणी करण्यात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष असल्यानं शिंदे शिवसेनेचा महापौर असावा अशी मागणी जोर धरु लागलीय. ही मागणी दिल्लीतून कोण करायला सांगतंय, असा सवाल राऊतांनी विचारलाय. तर युतीतले नेते मात्र महायुतीचाच महापौर होईल असं सांगतायेत.
हे सगळं सुरू असल्यानं नेमकं महापौरपद कुणाकडे जाणार असा प्रश्न सर्वसामान्य मुंबईकरांना पडलाय. या चर्चेतच ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहतील, अशीही शक्यता वर्तवण्यात येतंय. शिंदेंना शह देण्यासाठी भाजप-ठाकरे अशी खेळी करू शकतात. राजकारणात काहीही घडू शकतं असं सांगत भाजपच्या नवनाथ बन यांनी सस्पेन्स आणखीच वाढवला. महापौरपदी कोण बसेल, याच्या अनेक शक्यताच त्यामुळं समोर आल्यात.
मुंबईचं महापौरपद, पाच शक्यता
1. भाजपा- शिंदे एकत्र राहून भाजपचा महापौर निवडून येईल
2. शिंदेंना शह देण्यासाठी ठाकरे मतदानापासून दूर राहून भाजपचा मार्ग मोकळा करतील
3. शिंदेंना दूर ठेवण्यासाठी ठाकरेंचे नगरसेवक फोडून भाजप बहुमतापर्यंत पोहचेल
4. शिंदे ठाकरेंचे नगरसेवक फोडून आपली ताकद वाढवतील आणि महापौरपदावर दावा करतील
5. शिंदेंचे दोन तृतियांश नगरसेवक ठाकरेंकडे गेले तर काँग्रेसच्या साथीने ठाकरेंना महापौरपद
अशा शक्यता असल्या तरी प्रत्येक जण आपली खेळी करण्याचा प्रयत्न करेल. त्यातच ठाकरेंचे नगरसेवक मतदानावेळी अनुपस्थित राहतील या चर्चेनं ठाकरे भाजपाला पाठिंबा देतील अशी शक्यता निर्माण झाली. तसं झालं तर शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी होऊ शकते. ही चर्चा सुरू असतानाच शिंदेंच्या शिवसेनेनं महायुतीचाच महापौर होईल असं सांगत माघार घेतल्याचीही चर्चा रंगलीय. महापौर पदाची सोडत, मुख्यमंत्र्यांचा दावोस दौरा हे सगळं पाहता महापौर निवडीसाठी आणखी आठवडा जाण्याची शक्यता आहे. या काळात आणखी नवी काही राजकीय समीकरणंही समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. प्रत्यक्ष महापौर निवडीपर्यंत मुंबईचा महापौर कोण होणार, याचा सस्पेन्स कायम राहील असंच सध्या तरी दिसतंय.





