पुणे – पुणे जिंकण्यासाठी गेल्या 15 दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा खाली बसलाय. लाऊड स्पीकरवरून घुमणारा उमेदवारांचा जयघोष आता थंडावलाय. मात्र त्याआधी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सभांच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सभा घेतली नाही, मात्र भव्य रोड शो करून प्रचारात जान आणली.त्यामुळं पुण्यातील राजकारण चांगलंच तापलंय.
पुण्यात बहुरंगी लढती
पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील यंदाच्या महापालिका निवडणुकीचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे बदललेली राजकीय समीकरणं… राज्यात एकत्र सत्तेवर असलेले भाजप, शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे महायुतीतील तिन्ही पक्ष पुण्यात एकमेकांविरोधात दंड थोपटून उभे आहेत. तर दुसरीकडं आपापसातील मतभेद विसरून अजित पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मात्र एकत्रितपणे निवडणुकांना सामोरं जातंय. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीमुळं पुण्यातील निवडणूक बहुरंगी ठरणाराय…
महायुतीतच संघर्ष
यंदाची महापालिका निवडणूक विशेष गाजली ती भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळं… महायुती सरकारमध्ये एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसणारे अजित पवार आणि भाजप नेते यांच्यात भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून जुंपली… अजित पवारांनी भाजपची तुलना लुटारुंच्या टोळीशी केली, तर अजित पवारांना सोबत घेऊन पश्चाताप झाल्याची भावना रविंद्र चव्हाणांनी व्यक्त केली.
पुणेकरांना मोफत मेट्रो, बस प्रवासाचं आश्वासन
पुणेकरांना मोफत मेट्रो आणि बस प्रवास उपलब्ध करून देण्याची घोषणा अजित पवारांनी जाहीरनाम्यात केली. त्यावरून थेट मुख्यमंत्री फडणवीसांनीच टोला लगावला…
हवाई प्रवास मोफत देऊ सांगायला आपल्या बापाचं काय जातंय? असं मुख्यमंत्री म्हणाले.
कोणत्या मुद्द्यांवर झाला प्रचार?
यंदा सर्वच पक्षांना बंडखोरीचा फटका बसलाय. निष्ठांवंतांना डावलून आयात उमेदवारांना तिकिटं देण्यात आल्यानं अनेकांनी बंडाचं निशाण फडकावलं. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून गजा मारणे आणि बंडू आंदेकर यासारख्या गुंडांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्यानं त्यावरूनही जोरदार टीका झाली. पुण्यातील ट्रॅफिक, मेट्रो, पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन या स्थानिक प्रश्नांऐवजी नेत्यांच्या भाषणात ‘प्रतिष्ठा’ आणि ‘राज्यातील सत्ता’ हेच विषय जास्त गाजले.
मतदारांना आकर्षित करण्यासाठी कार्यकर्त्यांची पळवापळवी आणि फोडाफोडीचे राजकारणही शिगेला पोहोचलं… त्यामुळं गुरुवारी सुजाण पुणेकर कुणाच्या पारड्यात वजन टाकणार, याची उत्सूकता आहे.





