राजकारणात लवचिक भूमिका घेणार, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीच्या पोस्टमध्ये राज ठाकरेंचे काय संकेत?

Written by:Smita Gangurde
Published:
राज ठाकरेंच्या भूमिकांच्या बाबतीत मात्र ३६० अंशांचे बदल गेल्या काही वर्षांत दिसतायेत. त्यामुळे आता आणखी कोणती नवी लवचिक भूमिका घेणार असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.
राजकारणात लवचिक भूमिका घेणार, शिवसेनाप्रमुखांच्या जन्मशताब्दीच्या पोस्टमध्ये राज ठाकरेंचे काय संकेत?

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जनशताब्दीच्या जयंतीदिनीच राजकारणात लवचिक भूमिका घेणार असल्याचे संकेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलेत. यामुळे ठाकरे युतीचं काय होणार, असा प्रश्न नव्यानं उपस्थित झालाय. यावर राजकीय क्षेत्रातूनही निरनिराळ्या प्रतिक्रिया उमटतायेत..

मुंबई महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं २० वर्षांनंतर ठाकरे बंधू एकत्र आले. मुंबईत भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या महायुतीशी त्यांनी जोरदार संघर्ष केला. मात्र सत्ता राखण्यात ते अपयशी ठरले. एकत्र आलो आहोत, एकत्र राहण्यासाठी, हेच सूत्र राहणार असल्याचं निकालानंतरही जाणवत राहिलं. याच काळात कल्याण डोंबिवली महापालिकेत मनसेच्या गटानं शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला, या घडामोडींनी अनेकांच्या भुवया उंचावल्या. ठाकरे युतीचं काय होणार, असा प्रश्न विचारण्यात येऊ लागला.

राज ठाकरेंची लवचिक भूमिका

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीच्या दिनी राज ठाकरेंनी लिहलेल्या पोस्टमुळेही या संभ्रमात भर टाकलीय. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्तानं लिहिलेल्या पोस्टमध्ये राज ठाकरेंनी लवचिक भूमिका घेणार, हे स्पष्टपणे सांगितलंय

राज ठाकरेंनी पोस्टमध्ये लिहिलंय की, राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. म्हणून त्यांचं मराठी माणसावरचं प्रेम कधीही कमी झालं नाही. उलट ते दृढच होत गेलं. हेच संस्कार आमच्यावरही आहेत. मी एक शब्द आज पुन्हा देतोय की, आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल

राज ठाकरे महायुतीत परतणार?

राज ठाकरेंच्या या पोस्टनंतर ठाकरे शिवसेनेनं यावर बोलण्याचं टाळलंय. तर मनसेकडून लवचिक भूमिकेचं समर्थन करण्यात आलंय. राज ठाकरे महायुतीसोबत परत येतील अशा आशावाद भाजपानं व्यक्त केलाय.मुंबईत मनसेचे फक्त ६ नगरसेवक निवडून आणत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसल्याची टीकाही करण्यात आलीय. तर राज ठाकरेंनी शिंदे शिवसेनेला कल्याण डोंबिवलीत पाठिंबा दिला, त्यांचा नेहमीच पाठिंबा असतो, असं वक्तव्य प्रताप सरनाईक यांनी केलंय. राज ठाकरे यांच्या या संकेतानं ठाकरे युतीचं पुढं काय होणार, हा प्रश्न आता उपस्थित झालाय.

बाळासाहेब ठाकरेंची लवचिक भूमिका

बाळासाहेब ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचा दाखला देत राज ठाकरे यांनी त्यांच्या लवचिक भूंमिकेचं समर्थन केलंय.
बाळासाहेब ठाकरेंनी काय लवचिक भूमिका घेतल्या त्याही पाहूयात.

1. 1966 साली मराठी अस्मितेसाठी शिवसेनेची स्थापना, परप्रातियांना विरोध
2. सुरुवातीच्या काळात शिवसेनेला काँग्रेसची अप्रत्यक्ष मदत मिळाली
3. 1975 च्या आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधींना पाठिंबा
4. 1977 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेससोबत युती
5. 1984 साली लोकसभेसाठी शिवसेनेची भाजपसोबत पहिली युती, शिवसेनेचे उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर लढले
6. 1987 राम मंदिराचं आंदोलन देशव्यापी होत असताना शिवसेनेची भूमिका हिंदुत्ववादी
7. 1995 साली महाराष्ट्रात पहिलं शिवसेना-भाजप युती सरकार स्थापन
8. सुरुवातीला इंदिरा गांधींना पाठिंबा देणारे बाळासाहेब 1984 नंतर, इंदिरा गांधींच्या मृत्यूनंतर गांधी कुटुंबविरोधी
9. १९९८ नंतर शिवसेना 2014 पर्यंत एनडीएचा घटक पक्ष, 2019 लोकसभा-विधानसभेतही एकत्र

राज ठाकरेंची लवचिकता

बाळासाहेबांच्या या लवचिक भूमिकेनंतर आता राज ठाकरेंच्या लवचिकतेवरही एक नजर टाकूयात.

1. 2006 साली पक्षस्थापनेनंतर मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर लढा, अखंड शिवसेनेला विरोधाची भूमिका
2. 2009 लोकसभा निवडणुकीत मनसेमुळं शिवसेनेचं मोठं राजकीय नुकसान
3. 2009 विधानसभेत 13 आमदार विजयी, काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला मुद्दानिहाय पाठिंबा
4. 2012 साली मुंबई महापालिका निवडणुकीत स्वतंत्र भूमिका, शिवसेना भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादीवरही टीका
5. 2014 साली लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पाठिंबा, निवडणूक लढवली नाही
6. 2014 विधानसभा निवडणुकीत स्वतंत्र लढत, 1 आमदार विजयी
7. 2017 साली मुंबई महापालिका निवडणुकीत नगरसेवकांची संख्या 28 वरुन सातवर
8. 2019 लोकसभा निवडणुकीत मोदी-शहांविरोधात भूमिका, निवडणूक लढले नाहीत
9. 2019 विधानसभेतही भाजप विरोधी भूमिका, एकही आमदार निवडून आला नाही
10. 2022 साली शिंदे शिवसेना आणि भाजपजवळ जाणारी वक्तव्य, हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचे संकेत
11. 2024 लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिले नाहीत, महायुतीच्या सभेला उपस्थिती
12. 2026 मुंबई महापालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंशी युती

कोणती नवी लवचिक भूमिका घेणार?

बाळासाहेब ठाकरेंच्या भूमिका पाहिल्या तर त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन हिंदुत्वावर गेल्यानंतर अखेरपर्यंत त्या मुद्द्यावरुन माघार घेतली नाही. भाजपवर नाराजी व्यक्त करत, प्रसंगी वेगळ्या भूमिका घेऊनही ते एनडीएत राहिले. राज ठाकरेंच्या भूमिकांच्या बाबतीत मात्र ३६० अंशांचे बदल गेल्या काही वर्षांत दिसतायेत. त्यामुळे आता आणखी कोणती नवी लवचिक भूमिका घेणार असा प्रश्न सामान्य जनतेला पडलाय.

 

Follow Us :GoogleNews