महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार का, गेल्या वेळी किती झाले होते मतदान, मतदान वाढलं तर कुणाला फायदा?

Written by:Smita Gangurde
Published:
गेल्या वेळी पेक्षा मतदानाचा टक्का वाढला तर त्याचा फायदा विरोधकांना होतो, अशी शक्यता वर्तवण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांत हा वाढलेला आकडा सत्ताधाऱ्यांनाही फायद्याचा ठरलेला आहे.
महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढणार का, गेल्या वेळी किती झाले होते मतदान, मतदान वाढलं तर कुणाला फायदा?

मुंबई- मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे,  पिंपरी चिंचवड, नाशिकसह राज्यातील 29 महापालिका निवडणुकांत मतदानाला सकाळपासून सुरुवात झालेली आहे. सात वर्षांनी होणारी ही निवडणूक अत्यंत चुरशीची असून सत्ताधारी भाजप, शिंदे शिवसेना, अजित पवार राष्ट्रवादी यांच्यासह ठाकरे बंधू, शरद पवार, काँग्रेस, वंचित यांची प्रतिष्ठा या निवडणुकांत पणाला लागलेली आहे..

गेल्या महिनाभरापासून या निवडणुकीसाठी जोरदार प्रचार राज्यात झाला. मराठी अस्मिता, मुंबई उद्योगपतींना देण्यात येत असल्याचा प्रचार, मराठी-अमराठी, भ्रष्टाचार या मुद्दयांवर प्रचार सुरु आहे. मुंबईत युती विरुद्ध ठाकरे युती असा संघर्ष आहे. तर अनेक ठिकाणी महायुतीतील पक्षच आमने सामने उभे ठाकलेले आहेत.

मतदार कुणाला कौल देणार?

राज्यभरात झालेल्या झंझावाती प्रचारानंतर आता साडे तीन कोटी मतदार कुणाच्या पारड्यात कौल टाकणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गेल्या वेळी पेक्षा मतदानाचा टक्का वाढला तर त्याचा फायदा विरोधकांना होतो, अशी शक्यता वर्तवण्यात येते. मात्र गेल्या काही निवडणुकांत हा वाढलेला आकडा सत्ताधाऱ्यांनाही फायद्याचा ठरलेला आहे. महापालिका निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढला तर चुरशीच्या निवडणुकीत कुणाचा विजय होणार, हे सांगणं अवघड असल्याचं मानण्यात येतंय.

गेल्या वेळी किती टक्के झालं होतं मतदान?

2017 च्या महापालिका निवडणुकीत किती टक्के मतदान झालं होतं, त्यावर एक नजर टाकूयात

1. मुंबई- 56 टक्के
2. ठाणे – 58 टक्के
3. नवी मुंबई- 48 टक्के
4. कल्याण डोंबिवली- 46 टक्के
5. पनवेल- 60 टक्के
6. मिरा भाईंदर – 53 टक्के
7. भिवंडी- 51 टक्के
8. उल्हासनगर- 46 टक्के
9. वसई-विरार- 49 टक्के
10. पुणे- 56 टक्के
11. पिंपरी चिंचवड- 67 टक्के
12. कोल्हापूर- 69 टक्के
13. सांगली- 62 टक्के
14. इचलकरंजी- 76 टक्के
15. सोलापूर- 60 टक्के
16. संभाजीनगर- 63 टक्के
17. नांदेड- 65 टक्के
18. लातूर- 53 टक्के
19. नाशिक- 61 टक्के
20. मालेगाव- 60 टक्के
21. अहिल्यानगर- 68 टक्के
22. जलगाव- 57 टक्के
23. धुळे- 58 टक्के
24. नागपूर – 54 टक्के
25. अकोला- 56 टक्के
27. चंद्रपूर- 53 टक्के
28. अमरावती- 54 टक्के

आता या टक्केवारीत आज किती वाढ होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. यातून सत्ता परिवर्तन होणार का हे स्पष्ट होणार आहे

Follow Us :GoogleNews