मुंबई – राज्यातील 29 महापालिका निवडणुकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल आणि 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर लागलीच राज्यात झेपी निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. 31 जानेवारीपर्यंत राज्यातील स्थआनिक स्वराज्य संस्थांची निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते. याच आदेशाला 15 दिवसांची मुदतवाढ सुप्रीम कोर्टानं दिलीय. म्हणजेच 15 फेब्रुवारीपूर्वी राज्यातील काही जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील, असं दिसंतय.
राज्य निवडणूक आयोगाची तयारी, 5 फेब्रुवारीपूर्वी मतदान
महापालिका निवडणुकांनंतर राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाची तयारी पूर्ण असल्याचं सांगण्यात येतंय. त्यामुळे येत्या एक ते दोन दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. निवडणुका जाहीर झाल्यापासून मतमोजणी होईपर्यंत सुमारे महिनाभराचा कालावधी लागतो. त्यातच 10 फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षा सुरु होते आहे, त्यापूर्वी मतदान व्हावे, यासाठी प्रयत्न होण्याची शक्यता आहे.
दोन टप्प्यात झेडपी निवडणुका?
राज्यातील जिल्हा परिषदांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. 20 जिल्हापरिषदा आणि 88 पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या वगळून इतर जिल्हा परिषदांच्या निवडणुका होतील असं नियोजन निवडणूक आयोगानं केल्याची माहिती आहे.
कोणत्या 12 जिल्हा परिषदांच्या निवडणुका
यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, संभाजीनगर, परभणी, लातूर, धाराशिव या जिल्हा परिषदांच्या निवडणुका लागलीच होण्याची शक्यता आहे.





