मुंबई- सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांच्या देशव्यापी भ्रष्टाचारविरोधी मोहिमेतून २०१२ साली निर्माण झालेला पक्ष म्हणजे आम आदमी पार्टी. अण्णा हजारेंच्या रामलीला मैदानातल्या आंदोलनाची धुरा सांभाळणारे अरविंद केजरीवाल हे नंतर या पक्षाच्या लाटेवर स्वार झाले आणि त्यांनंतर दोन वेळा त्यांनी दिल्ली काबीज केली. इतकंच नाही तर दिल्लीच्या शेजारच्या पंजाब राज्यातही सत्ता मिळवण्यात त्यांना यश आलं.
मात्र ज्या मराठमोठ्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनातून हा पक्ष उभा राहिला, ते अण्णा मात्र या राजकीय प्रवाहात बाजूला पडले, इतकंच नाही चळवळींसाठी पोषक असलेल्या महाराष्ट्रातही हा पक्ष तगू शकला नाही.
महापालिकेत आप दिसेना
आता तर यंदाच्या निवडणुकीत अगदी मोजक्या पुणे आणि कोल्हापूर व्यतिरिक्त इतर ठिकाणी हा पक्ष नावालाही दिसत नाहीये. आम आदमी पार्टीचे नेते मात्र राज्यात ९० पेक्षा जास्त उमेदवार दिला असल्याचा दावा पक्षाचे नेते करतायेत.
आपचं काय चुकलं?
अण्णांच्या आंदोलनानंतर आणि आपच्या स्थापनेनंतर मुंबई, पुणे, नागपूर या ठिकाणी संघटनात्मक बांधणी करण्याचा प्रयत्न आपच्या वतीनं करण्यात आला. दिल्लीच्या धर्तीवर मुंबई, पुण्यातील नागरी समस्या घेऊन त्यातून आंदोलन करण्याचा आणि राजकीय स्पेस निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, मात्र त्यात पक्षाला पुरेसं यश आलं नाही.
प्रबळ नेतृत्वाचा अभाव
या प्रवासात अजंली दमानिया, प्रीती मेनन, विजय कुंभारे, संदीप देसाई यासारख्या काही कार्यकर्त्यांनी पक्ष रुजण्यासाठी प्रयत्न कले. मात्र त्याला फारसं यश मिळू शकलं नाही. राज्यात योग्य आणि दीर्घकालीन नेतृत्व न मिळाल्यानं आप मूळ धरु शकली नाही, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणंय.
राज्यात भाजपा, काँग्रेससोबतच शिवसेना, राष्ट्रवादी असे प्रादेशिक पक्ष २००९ नंतर अस्तित्वात होते. त्यांची राजकीय ताकदही मोठी होती. त्यांना छेद देत राजकीय पक्ष म्हणून उभं राहण्यात आपला यश आलं नाही.
सुशिक्षित उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या शोधात दिल्लीत जितकं तरुण नेतृत्व आपकडे आलं, तसं मुंबई किंवा इतर शहरात घडताना दिसलं नाही. दिल्लीतूनही मुंबईत रुजण्यासाठी फारसं पाठबळ पक्षातील नेत्यांना मिळालं का, हाही चर्चेचा विषय आहे.
पुढे काय होणार?
पारंपरिक राजकारण सोडून इतर पक्षातील नेतेही आपकडे फिरकले नाहीत. २०१९ नंतरच्या बदलत्या राजकारणात आप पूर्णपणे पिछाडीवर फेकला गेला. २०१९ नंतर राज्याच्या राजकारणात एमआयएम तर मराठवाड्यात बीआरएसनं शिरकाव केला, त्यांना आपपेक्षा चांगलं राजकीय पाठबळही मिळालं, मात्र त्यांनाही फारसं यश मिळवता आलेलं नाही. सध्याच्या युती-आघाड्यांच्या राजकारणात आपला राज्यात फारसा जनाधार नसल्याचं आणि पक्ष नेतृत्वहीन असल्याचं दिसतंय. दिल्लीच्या पराभवानंतर आपची राष्ट्रीय पक्ष अशी शक्तीही क्षीण झाल्यासारखी दिसते आहे. आता आपचा पुढचा प्रवास राज्यात याहीपेक्षा दुर्लक्षित असेल की त्याला नवसंजीवनी मिळेल, हे पाहावं लागणार आहे.





