AI मुळे नोकऱ्यांना धोका की संधी? आर्थिक सर्वेक्षणात सरकारचा स्पष्ट रोडमॅप

Published:
आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ संसदेत सादर करताना केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक भविष्यासोबतच तंत्रज्ञानाच्या बदलत्या दिशेवरही महत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयवर स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा करण्यात आली
AI मुळे नोकऱ्यांना धोका की संधी? आर्थिक सर्वेक्षणात सरकारचा स्पष्ट रोडमॅप

आर्थिक सर्वेक्षण २०२५-२६ संसदेत सादर करताना केंद्र सरकारने देशाच्या आर्थिक भविष्यासोबतच तंत्रज्ञानाच्या बदलत्या दिशेवरही महत्त्वाचा प्रकाश टाकला आहे. यंदाच्या आर्थिक सर्वेक्षणात प्रथमच कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयवर स्वतंत्रपणे सविस्तर चर्चा करण्यात आली असून, एआय आता भविष्यातील कल्पना नसून आजचं वास्तव असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.

कोणकोणत्या क्षेत्रात AI चा प्रभाव

या सर्वेक्षणानुसार, एआयचा प्रभाव आता केवळ तंत्रज्ञान क्षेत्रापुरता मर्यादित राहिलेला नाही, तर शेती, आरोग्य, शिक्षण, उद्योग आणि सेवा क्षेत्रातही मोठ्या प्रमाणावर जाणवत आहे. जगभरातील बहुतेक कंपन्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपात एआयचा वापर करत असून, हे तंत्रज्ञान आता विकसित देशांपुरते सीमित न राहता भारतासारख्या मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्येही वेगाने रुजत आहे.

आर्थिक सर्वेक्षणात भारतासाठी एक वेगळा आणि व्यवहार्य एआय रोडमॅप मांडण्यात आला आहे. मोठ्या, खर्चिक आणि क्लिष्ट एआय प्रणाली तयार करण्याऐवजी, शेती, आरोग्य, शिक्षण आणि ग्रामीण समस्यांवर लक्ष केंद्रित करणारी लहान, क्षेत्र-विशिष्ट एआय मॉडेल्स विकसित करण्यावर भर देण्यात आला आहे. ही मॉडेल्स कमी संगणकीय शक्तीवर चालू शकतात आणि स्मार्टफोन किंवा स्थानिक संगणकांवर सहज वापरता येतात. यामुळे स्टार्टअप्स, विद्यापीठे आणि स्थानिक उद्योगांना नवकल्पनांमध्ये सहभागी होण्याची मोठी संधी मिळणार आहे.

रोजगारतही महत्वाची भूमिका

रोजगाराच्या दृष्टीनेही सर्वेक्षणात महत्त्वाची भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. एआयमुळे अचानक मोठ्या प्रमाणावर नोकऱ्या जाणार नाहीत, मात्र उत्पादकता वाढीचा वेग आणि रोजगारनिर्मितीचा वेग यात फरक राहू शकतो. भारतासारख्या श्रमप्रधान देशात एआयचा वापर थेट नोकऱ्या काढून टाकण्यासाठी नव्हे, तर कर्मचाऱ्यांची क्षमता वाढवण्यासाठी केला गेला पाहिजे, असा स्पष्ट संदेश या सर्वेक्षणातून देण्यात आला आहे.

डेटा सुरक्षेच्या मुद्द्यावरही आर्थिक सर्वेक्षणात चिंता व्यक्त करण्यात आली आहे. भारतातील कोट्यवधी नागरिक इंटरनेटचा वापर करतात, मात्र त्यांचा डेटा अनेकदा परदेशात प्रक्रिया केला जातो. त्यामुळे भारतीय डेटाचे संरक्षण करणे, कंपन्यांची जबाबदारी निश्चित करणे आणि देशांतर्गत डेटा आधारित नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे अत्यंत आवश्यक असल्याचं सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे.

शिक्षण आणि कौशल्य विकासाशिवाय एआयचे फायदे पूर्णपणे मिळू शकत नाहीत, असंही सर्वेक्षण स्पष्ट करते. शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर वाचन, तर्कशक्ती, विश्लेषण आणि समस्या सोडवण्याच्या कौशल्यांवर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. त्याचबरोबर उद्योग आणि शैक्षणिक संस्थांमधील सहकार्य वाढवल्यास तरुणांसाठी रोजगाराच्या संधी अधिक सक्षम होतील, असंही नमूद करण्यात आलं आहे.

एकूणच आर्थिक सर्वेक्षणाचा संदेश स्पष्ट आहे. एआय हा भारतासाठी धोका नसून एक धोरणात्मक संधी आहे. योग्य दिशेने, सुरक्षित पद्धतीने आणि तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या दृष्टिकोनातून एआयचा वापर केल्यास उत्पादकता वाढेल, रोजगार सुरक्षित राहील आणि भारत तांत्रिकदृष्ट्या अधिक स्वावलंबी बनेल.