LIC Policy : आपण सर्वजण आपल्या कुटुंबाच्या सुरक्षित भविष्यासाठी जीवन विमा पॉलिसी घेतो. LIC पॉलिसी हा अनेकांचा विश्वासाचा पर्याय असतो. मात्र आर्थिक अडचणी, उत्पन्नात घट किंवा इतर कारणांमुळे अनेकांना पॉलिसी मॅच्युरिटीपूर्वी बंद करायचा विचार येतो. पण हा निर्णय घेण्यापूर्वी त्याचे परिणाम समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.
सरेंडर व्हॅल्यू’ (LIC Policy)
LIC पॉलिसी मधेच बंद करण्याच्या प्रक्रियेला ‘पॉलिसी सरेंडर’ असं म्हटलं जातं. अनेकांचा गैरसमज असतो की आतापर्यंत भरलेले सगळे प्रीमियम परत मिळतील. मात्र प्रत्यक्षात असं होत नाही. पॉलिसी सरेंडर केल्यावर विमा कंपनी जी रक्कम देते, तिला ‘सरेंडर व्हॅल्यू’ म्हणतात आणि ही रक्कम बहुतेक वेळा भरलेल्या प्रीमियमपेक्षा खूपच कमी असते.
विशेषतः पॉलिसीच्या सुरुवातीच्या काही वर्षांत सरेंडर केल्यास मोठा आर्थिक फटका बसतो. कारण पहिल्या काही वर्षांत भरलेला प्रीमियम एजंट कमिशन, प्रशासकीय खर्च आणि इतर शुल्कांमध्ये खर्च होतो. त्यामुळे पहिल्या दोन ते चार वर्षांत पॉलिसी बंद केल्यास नुकसान जास्त होते. याशिवाय एंडोमेंट किंवा मनी-बॅक पॉलिसीतील बोनस आणि लॉयल्टी अॅडिशनसारखे फायदेही सरेंडर केल्यावर संपुष्टात येतात. LIC Policy
सुरक्षा कव्हर संपते
पैशांच्या नुकसानीपेक्षा मोठा तोटा म्हणजे सुरक्षा कव्हर संपणं. पॉलिसी सरेंडर केल्याक्षणी जीवन विमा संरक्षण पूर्णपणे बंद होतं. भविष्यात काही अनुचित घडल्यास कुटुंबाला कोणतीही आर्थिक मदत मिळत नाही. विशेषतः टर्म इन्शुरन्सच्या बाबतीत पॉलिसी बंद केल्यावर ना कव्हर उरतं, ना पैसे परत मिळतात.
मात्र पॉलिसी बंद करणे हाच एकमेव पर्याय नाही. आर्थिक अडचण असल्यास ‘पेड-अप पॉलिसी’ हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. यामध्ये पुढील प्रीमियम भरावे लागत नाहीत, मात्र आतापर्यंत भरलेल्या प्रीमियमच्या आधारे कमी विमा रकमेवर पॉलिसी सुरू राहते. कव्हर कमी होतं, पण पूर्णपणे संपत नाही. याशिवाय IRDAI ने अलीकडेच नियमांमध्ये बदल करून काही पॉलिसींमध्ये सरेंडर व्हॅल्यू थोडी सुधारली आहे. त्यामुळे अंतिम निर्णय घेण्यापूर्वी विमा कंपनीकडून सरेंडर व्हॅल्यू आणि पेड-अप व्हॅल्यू यांची सविस्तर माहिती घेणं गरजेचं आहे.






