SBI ATM Charge Hike : ATM मधून पैसे काढणे आणखी महाग; SBI कडून ग्राहकांना झटका

Published:
एसबीआयमध्ये सेव्हिंग अकाउंट असलेल्या ग्राहकांना दरमहा इतर बँकांच्या एटीएममधून ५ आर्थिक आणि ५ गैर-आर्थिक असे एकूण १० मोफत व्यवहार करता येतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आता २३ रुपये + GST आकारले जाणार आहेत
SBI ATM Charge Hike : ATM मधून पैसे काढणे आणखी महाग; SBI कडून ग्राहकांना झटका

SBI ATM Charge Hike : देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. आता एसबीआय ग्राहकांसाठी एटीएममधून पैसे काढणे अधिक खर्चिक ठरणार आहे. बँकेने एटीएम व्यवहारांवरील शुल्कात वाढ जाहीर केली आहे. या नव्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडणार आहे. इंटरचेंज शुल्क वाढल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचे एसबीआयने स्पष्ट केले आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याआधीही फेब्रुवारी २०२५ मध्ये एसबीआयने एटीएम व्यवहार शुल्कात वाढ केली होती.

किती रुपयांनी वाढले शुल्क? | SBI ATM Charge Hike

एसबीआयमध्ये सेव्हिंग अकाउंट असलेल्या ग्राहकांना दरमहा इतर बँकांच्या एटीएममधून ५ आर्थिक आणि ५ गैर-आर्थिक असे एकूण १० मोफत व्यवहार करता येतात. मात्र ही मर्यादा ओलांडल्यानंतर प्रत्येक आर्थिक व्यवहारासाठी आता २३ रुपये + GST आकारले जाणार आहेत. याआधी हे शुल्क २१ रुपये + GST इतके होते. तसेच गैर-आर्थिक व्यवहारांसाठीचे शुल्क १० रुपयांवरून वाढवून ११ रुपये + GST करण्यात आले आहे.

बँकेने दिला हा सल्ला

बँकेच्या माहितीनुसार, जर ग्राहकांनी वारंवार इतर बँकांचे एटीएम वापरले, तर त्यांना आता जास्त शुल्क भरावे लागेल. मात्र एसबीआयच्या स्वतःच्या एटीएममधून पैसे काढल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी बँकेने ग्राहकांना UPI, YONO अ‍ॅप किंवा शाखांमधील डिजिटल सेवा वापरण्याचा सल्ला दिला आहे. वाढत्या बँकिंग खर्चाच्या पार्श्वभूमीवर हा बदल छोटा असला तरी महत्त्वाचा मानला जात आहे.

दरम्यान, बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खातेधारकांसाठी सध्याच्या सेवा शुल्कामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच एसबीआय डेबिट कार्डधारकांनी एसबीआयचे स्वतःचे एटीएम किंवा ADWM वापरल्यास त्यांच्या व्यवहार शुल्कातही कोणतीही वाढ होणार नाही. पुढील आदेश येईपर्यंत एसबीआय एटीएममधून कार्डलेस रोख व्यवहार (YONO Cash सारखे) मोफत व अमर्यादित राहणार आहेत. त्यामुळे अनेक ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews