भारतात रोजच्या व्यवहारांमध्ये सुट्ट्या पैशांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. विशेषतः १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटा सहज मिळत नसल्यामुळे सामान्य नागरिक, किरकोळ व्यापारी आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी ५०० रुपयांच्या नोटांचे सुट्टे नसल्याने वादविवादही होत असल्याचं चित्र आहे.
याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक पाऊल उचलण्याची तयारी सुरू केली आहे. लहान नोटांचा तुटवडा दूर करण्यासाठी सरकारकडून ‘हायब्रीड एटीएम’ ही नवी संकल्पना राबवण्याचा विचार केला जात आहे. हे हायब्रीड एटीएम पारंपरिक एटीएम आणि कॉइन वेंडिंग मशीनचे मिश्र स्वरूप असणार आहेत.
सुट्ट्या पैशाची अडचण मिटणार
या नव्या एटीएममधून नागरिकांना केवळ मोठ्या मूल्याच्या नोटाच नाही, तर थेट १०, २० आणि ५० रुपयांच्या नोटाही मिळणार आहेत. त्यामुळे सुट्ट्या पैशांसाठी होणारी धावपळ आणि गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सध्या ही योजना प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून, मुंबईतील काही ठिकाणी लहान नोटा देणाऱ्या या नव्या मशीनची चाचणी सुरू आहे. सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, ही चाचणी यशस्वी ठरल्यास बस स्थानके, रेल्वे स्थानके, बाजारपेठा, रुग्णालये आणि सरकारी कार्यालयांसारख्या गर्दीच्या ठिकाणी हे हायब्रीड एटीएम बसवण्यात येणार आहेत.
लहान नोटांच्या तुटवड्याचा सर्वाधिक फटका किरकोळ व्यापाऱ्यांना बसत आहे. ग्राहकांकडे ५०० रुपयांच्या नोटा असतात, मात्र सुट्टे नसल्याने व्यवहार अडतात. नव्या व्यवस्थेमुळे हे व्यवहार अधिक सोपे आणि सुरळीत होतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
सध्या किती नोटा आहेत
दरम्यान, आरबीआयच्या आकडेवारीनुसार सध्या चलनात असलेल्या नोटांमध्ये ५०० रुपयांच्या नोटांचा संख्येने सुमारे ४१ टक्के, तर मूल्याने तब्बल ८६ टक्के वाटा आहे. याच्या तुलनेत लहान नोटा जास्त असल्या तरी त्यांचे एकूण मूल्य कमी आहे. तज्ज्ञांच्या मते, हायब्रीड एटीएमसोबतच लहान नोटांची छपाई, वितरण आणि पुनर्वापर प्रक्रिया अधिक सक्षम केली, तर सुट्ट्या पैशांचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागू शकतो. सरकारचा हा निर्णय सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासा देणारा ठरणार असल्याचं बोललं जात आहे.






